वाटूळ गोवंदवाडीत अखेर पेटला दिवा!
By admin | Published: September 22, 2016 11:49 PM2016-09-22T23:49:02+5:302016-09-23T00:41:14+5:30
राजापूर तालुका : स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानंतर प्रकाशली घरे
आनंद त्रिपाठी -- वाटूळ --मुंबई-गोवा महामार्गालगत वसलेल्या राजापूर तालुक्यातील वाटूळ या गावामधील बावकर गोवंदवाडीतील घरांना २१ वे शतक उजाडले तरीही विजेची प्रतीक्षा होती. गावापासून दोन किलोमीटर अंतरावर डोंगराळ व जंगलमय भागात वसलेल्या या वाडीत बावकर व मोहिते यांची तीन घरे आहेत.
वाटूळचे माजी सरपंच व शिवसेना कार्यकर्ते नारायण चव्हाण यांनी राजापूरमधील आमसभेमध्ये आमदार राजन साळवी यांच्यासमोर या वाडीतील विजेबाबतची सत्य परिस्थिती मांडल्यानंतर सर्वजण हादरले. स्वातंत्र्यानंतरही याठिकाणी वीज नसल्याचे विदारक सत्य समोर आल्यानंतर आमदारांनी दखल घेतली. आमदार राजन साळवी यांनी या प्रश्नाची गंभीर घेतली व लागलीच प्रशासन यंत्रणा कामाला लागली. महावितरणच्या ओणी कार्यालयाने या वाडीमध्ये वीज पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि गणेशाचे आगमना दिवशीच या वाडीची विजेची प्रतीक्षा संपली व खऱ्या अर्थाने वाडीचे ‘अच्छे दिन’ सुरु झाले.
काही जागा मालकांच्या असलेल्या विरोधामुळेच या वाडीत वीज पोहोचण्यास विलंब झाल्याचे या वाडीतील लोकांचे म्हणणे आहे. वीजखांबांसाठी जागा देण्यास विरोध करणाऱ्या जागा मालकांची समजूत घालून योग्य तोडगा काढणाऱ्या माजी सरपंच नारायण चव्हाण यांच्यामुळे वाडीत वीज आल्याचे ग्रामस्थ मोतीराम बावकर यांनी सांगितले.
आमदार राजन साळवी यांनीही या विषयाची गंभीर दखल घेत त्वरित कार्यवाही केली. ओणी महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता डी. एस. मोहिते, कनिष्ठ अभियंता एस. आर. गुरव, एन. डी. कांबळे, टी. एच. घाडी, आर. जी. लोहार, एस. पी. मेश्राम यांच्या प्रयत्नांमुळे आणि जमीन मालकांच्या सहकार्यामुळे गोवंदवाडीतील विजेची समस्या सुटली आहे.
मुंबई - गोवा महामार्गालगत असणारे वाटूळ - गोवंदवाडी.
माजी सरपंच नारायण चव्हाण यांनी आमसभेत मांडली परिस्थिती.
वाडीतील विजेबाबतची सत्य परिस्थिती मांडल्यानंतर सर्वजण हादरले.
आमदार राजन साळवी यांनी घेतली होती दखल.
विजेची समस्या सुटली.