हवामानामुळे 'कोकणचा राजा' हवालदिल, उष्णतेच्या लाटेने आंब्याला धोका
By मेहरून नाकाडे | Published: February 16, 2023 01:09 PM2023-02-16T13:09:37+5:302023-02-16T13:10:16+5:30
बागायतदारांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार
मेहरुन नाकाडे
रत्नागिरी : गेल्या काही वर्षांत बदलत्या हवामानाचा कोकणातील फलोत्पादनाला चांगलाच फटका बसत आहे. यावर्षीही अचानक थंडी गायब होऊन उष्मा प्रचंड वाढला आहे. जिल्ह्याचे मुख्य उत्पादन असलेला आंबा ३४ अंश सेल्सियसपर्यंत तापमान सोसू शकतो. मात्र, सध्या ३५ अंशापेक्षा अधिक तापमान आहे. त्यामुळे आधीच उत्पादन अत्यल्प असलेला आंबा भाजण्याचा धोका निर्माण झाला आहे.
गतवर्षी पावसाळा लांबल्याने उशिरापर्यंत पालवी येत होती. केवळ दहा टक्के झाडांनाच नियोजित वेळेत मोहर आला. नोव्हेंबरमध्ये अपेक्षित असलेली थंडी जानेवारीपासून सुरू झाली. तेव्हा मोहर प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या टप्प्यात आलेल्या मोहराचा आंबा तयार होऊन दि. १५ मार्चपासून बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र हा आंबा दि. १५ एप्रिलपर्यंतच पुरेल. त्यानंतर बाजारात विक्रीसाठी आंबा उपलब्ध नसेल, असा अंदाज आहे.
दुसऱ्या टप्प्यात मोहर नसल्याने यावर्षी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. जानेवारीपासून मोहर येणे सुरू झाले. मात्र, त्याचे प्रमाण कमी आहे. रात्री थंडी व दिवसा कडकडीत ऊन अशी स्थिती आहे. थंडी पडत असली तरी दव पडत नाही. त्यामुळे मोहर प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. त्यातही जी फळप्रक्रिया सुरू झाली आहे, ती फळे अति उष्म्यामुळे पिवळसर पडून गळण्याची शक्यता आहे. याआधीच्या मोहराचे मोठे फळही भाजून त्यावर काळे डाग पडण्याचा धोका आहे व अशा आंब्याला बाजारात उठाव मिळत नाही.
वाढत्या उष्म्याच्या धोक्यासोबतच हवामानातील बदलामुळे थ्रीप्स, तुडतुडा तसेच फळमाशी यासारख्या रोगांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे बागायतदारांना वेळोवेळी महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे.
यावर्षी मुळातच आंबा कमी आहे, त्यातच नैसर्गिक बदलांमुळे पीक धोक्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत ३५ अंशापेक्षा अधिक तापमान आहे. आंबा पिकासाठी हे तापमान त्रासदायक ठरणारे आहे. त्यामुळे उष्म्याचे प्रमाण कमी न झाल्यास बागायतदारांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. - राजन कदम, बागायतदार