रुग्णालयांचे फायर आणि ऑक्सिजन ऑडिट होणार : जिल्हाधिकारी मिश्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:31 AM2021-04-24T04:31:19+5:302021-04-24T04:31:19+5:30
रत्नागिरी : वसई, विरार, नाशिक येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून जिल्ह्यातील खासगी आणि शासकीय रुग्णालयांचे फायर आणि ऑक्सिजन ऑडिट करणार. ...
रत्नागिरी : वसई, विरार, नाशिक येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून जिल्ह्यातील खासगी आणि शासकीय रुग्णालयांचे फायर आणि ऑक्सिजन ऑडिट करणार. त्यासाठी तालुकास्तरावर पथक नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी झूम ॲपद्वारे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले, जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. बबिता कमलापूरकर याही या ऑनलाइन पत्रकार परिषदेत उपस्थित होत्या.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ५००-६०० च्यावर जाऊ लागली आहे. फैलाव वाढल्याने आता गंभीर रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणणे, हे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान आहे. सध्या व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन बेड यांचा तुटवडा कधीही निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या अनुषंगाने उपाययोजनांची माहिती देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी जादा ऑक्सिजन बेड वाढविण्यात येणार आहेत, त्याविषयी त्यांनी माहिती दिली. सद्य:स्थितीत महिला रुग्णालयात ९९ टक्के तर जिल्हा रुग्णालयात ८० टक्के ऑक्सिजन बेड असून जिल्ह्यात सुमारे ८०० च्या आसपास बेड उपलब्ध आहेत. ११७ व्हेंटिलेटर्स ऑक्सिजन बेड आहेत.
सद्या हे पुरसे असले तरी वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करून अधिक बेड उपलब्ध करणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात ६० बेडची व्यवस्था झाली आहे. जिल्हा महिला रुग्णालयातही येत्या चार-पाच दिवसात १६० बेड उपलब्ध होणार असून त्याची तयारी सुरू आहे. कामथेत ६०, दापोली ४०, कळंबणी ५०, घरडा ७० परशुराम, दापोलीतील कृषी भवन येथील सीसीसीमध्येही बेड वाढविण्यात येणार आहेत. जिल्हा रुग्णालयात १ कोटी खर्चातून १७० जम्बो सिलिंडरची क्षमता असलेल्या ऑक्सिजन प्लांटची उभारणी झाली असून त्यातील ऑक्सिजन वायू सॅम्पलसाठी पाठविण्यात आला आहे. लवकरच कळंबणी, दापोली, कामथे याठिकाणीही प्लांट उभारण्यास सुरुवात होईल. विविध कंपन्यांकडून ड्युरासाठी वापरण्यात येणारे ऑक्सिजनचे जम्बो सिलिंडरही ताब्यात घेण्यात आले आहेत. रुग्णसंख्या वाढतेय, त्यामुळे संभाव्य गंभीर परिस्थितीचा विचार करता जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजन बेड वाढविण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सांगितले.
रेमडेसिविरच्या किमतीवर नियंत्रण
रेमडेसिविर इजेंक्शनच्या किमतीवर नियंत्रण राहील. सरकारने निश्चित केलेल्या १८५० जीएसटी यापेक्षा अधिक कुठल्याही खासगी रुग्णालयाला घेता येणार नाही. तसेच
उपचारासाठीही जादा खर्च आकारता येणार नाही. ऑडिटच्या अहवालावेळी हे लक्षात आल्यास अधिकचे पैसे द्यावे लागतील.
लससाठी बाहेरून येणाऱ्यांवर नियंत्रण
रत्नागिरी शहरातील लसीकरण केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी करून येणाऱ्यांची गर्दी होत आहे. मात्र, बाहेरच्यांना येऊन इथे लस घेता येणार नाही.
रूग्णांचेही ऑडिट करणार...
शुक्रवारपासून रुग्णांचेही ऑडिट होणार आहे. किती जणांना ऑक्सिजनची गरज आहे. व्हेंटिलेटर लागणार आहे. याची सर्व माहिती घेऊन ज्यांना आवश्यक नाही, अशांचे ऑक्सिजन काढून घेणार.
रत्नागिरीसाठीही ऑक्सिजनचा पुरवठा
महाराष्ट्रात विशाखापट्टणम आदी भागातून ऑक्सिजनचे टँकर शुक्रवारी सायंकाळपर्यंत येणार आहेत. त्यात रत्नागिरीचाही समावेश आहे. त्यामुळे भविष्यात रत्नागिरीत ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल.
डाॅक्टरांची भरती
जिल्ह्यात ३० डाॅक्टरांना नियुक्तीचे आदेश शुक्रवारी देण्यात आले असून निमा या आयुर्वेदिक डाॅक्टरांच्या संघटनेकडूनही ३५ डाॅक्टरांची यादी आली आहे. ४ डाॅक्टर्स आणि ३ किंवा ४ परिचारिकांचे ‘टेलिफोनिक’ पथक तयार करण्यात येणार असून हे पथक गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांना मार्गदर्शन करणार आहे.
यंत्रणा, हेल्पिंग हॅण्डस समन्वयाने काेरोना लढा
सामाजिक न्याय भवन येथे चांगले काम सुरू आहे. सर्वच ठिकाणी डाॅक्टर आणि अन्य आरोग्य कर्मचारी चांगले काम करीत आहेत. काही गडबड असेल तर ती सुधारली जाईल. सद्या परिस्थिती गंभीर आहे. ७० वर्षांवरील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. तरुणांमध्येही संसर्ग वाढतोय. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी घरीच रहावे. लॉकडाऊन कडकच असायला पाहिजे, त्यातून कुणालाच शिथिलता देता येणार नाही, असेही जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले.