मृतदेह ताब्यात देणाऱ्या रुग्णालयाचा परवाना रद्द करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:23 AM2021-06-06T04:23:56+5:302021-06-06T04:23:56+5:30
राजापूर : कोरोनाबाधित मृत व्यक्तीचे शव पिशवीतून बाहेर काढून अंत्यसंस्कार केल्याची बाब राजापुरात उघड झाल्यानंतर प्रशासनाची एकच तारांबळ उडाली ...
राजापूर : कोरोनाबाधित मृत व्यक्तीचे शव पिशवीतून बाहेर काढून अंत्यसंस्कार केल्याची बाब राजापुरात उघड झाल्यानंतर प्रशासनाची एकच तारांबळ उडाली आहे. ज्या खासगी रुग्णालयाने ‘तो’ मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला, त्या रुग्णालयाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव पाठवला जाणार असल्याची माहिती राजापूरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिली.
ज्या कोरोनाबाधितावर धार्मिक पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यात आले, ती व्यक्ती लांजा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होती. मात्र, उपचार सुरु असतानाच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संबंधित रुग्णालयाने मृत्यू झाल्याची बाब त्या व्यक्तीच्या नातवाईकांना कळवून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढील कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. या व्यक्तीच्या नातेवाईकांनी राजापूर नगर परिषदेचे ना हरकत प्रमाणपत्र व कोरोनाचे नियम पाळून अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे हमीपत्र सादर केल्याने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. तालुका प्रशासनाने ‘तो’ मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणाऱ्या लांजा येथील खासगी रुग्णालयावर कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रत्यक्षात तो मृतदेह ताब्यात देण्यासाठी पत्र देणाऱ्या शासकीय यंत्रणांना मात्र अभय दिले जात असल्याने आश्चर्य व्यक्त हाेत आहे.