खेर्डीतील वेश्या व्यवसायप्रकरणी हॉटेल व्यवस्थापक अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 05:17 PM2020-12-02T17:17:28+5:302020-12-02T17:18:44+5:30
Crimenews, chiplun, ratnagirinews खेर्डी येथे पश्चिम बंगालमधून तरुणींना आणून त्यांना अनैतिक धंद्यात जुंपल्याप्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक केली असताना सोमवारी आणखी एका हॉटेल व्यवस्थापकास अटक करण्यात आली आहे. यात अजूनही काहीजण गुंतले असल्याची शक्यता आहे.
चिपळूण : खेर्डी येथे पश्चिम बंगालमधून तरुणींना आणून त्यांना अनैतिक धंद्यात जुंपल्याप्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक केली असताना सोमवारी आणखी एका हॉटेल व्यवस्थापकास अटक करण्यात आली आहे. यात अजूनही काहीजण गुंतले असल्याची शक्यता आहे.
विजय प्रल्हाद काकडे (५२) असे अटक केलेल्या हॉटेल व्यवस्थापकाचे नाव आहे. तो मुळचा कऱ्हाड येथील असून, शहरातील बहादूरशेख नाका येथे एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम पाहात आहे. एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उघडकीस आलेल्या या प्रकरणातील मुख्य सूत्रधार भाजी व्यावसायिक मोहम्मद वसीम शेख याला अटक केली. त्यापाठोपाठ या व्यवसायात मदत करणारा रिक्षा व्यावसायिक अश्रफ हुसेन चौगुले (३८) यालाही पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता चौकशीमध्ये काकडे या हॉटेल व्यवस्थापकाचे नाव पुढे आल्याने त्यालाही अटक केली आहे.
या प्रकरणातील पीडित युवती मूळची पश्चिम बंगालमधील असून, नोकरीचे आमीष दाखवून तिला १२ ऑक्टोबरला खेर्डी येथे आणले होते. मराठी येत नसल्याने व परिसराची माहिती नसल्याने तिला प्रत्यक्ष त्या-त्या ठिकाणी नेऊन ज्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार झाले. त्याची पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे. यामध्ये शहरातील बहादूरशेख नाका येथील एका हॉटेलमध्ये तिला नेण्यात आले होते. या प्रकरणी मदत केल्यामुळे संबंधीत हॉटेल व्यवस्थापकास अटक करण्यात आली आहे.