Ratnagiri News: कशेडी घाट अपघातांचा ‘हॉटस्पॉट’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 03:27 PM2023-01-10T15:27:55+5:302023-01-10T15:28:17+5:30
वाहनचालकांचे प्रबोधन करणे आवश्यक
खेड : आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला ६ जानेवारी रोजी रात्री झालेल्या अपघातानंतर कशेडी घाटातील सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेला कशेडी घाट ‘हॉटस्पॉट’ ठरत आहे. याठिकाणी वेळीच उपाययोजना न केल्यास अपघातांचे प्रमाण असेच वाढत राहून अनेकांचा बळी जाण्याचा धोका आहे.
मुंबई - गोवा महामार्गावर सुमारे तेरा किलोमीटर अंतराचा हा तीव्र उतार व नागमोडी वळणे असलेला घाट आहे. पूर्व-पश्चिम सह्याद्री पर्वताच्या उपरांगामध्ये हा घाट तयार करण्यात आला आहे. चौपदरीकरणात या घाटाला पर्यायी बोगदा तयार करण्याचे काम गेली चार वर्षे सुरू आहे. अद्यापही हे काम पूर्ण न झाल्याने धाेकादायक मार्गावरूनच वाहने हाकावी लागत आहेत. कशेडी घाटात पोलिस व महामार्ग विभाग प्रशासनाने वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणांना ‘डेंजर हॉटस्पॉट’ ठरवले आहे.
आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झालेल्या ठिकाणी ७ नोव्हेंबर २०२२ रोजी रिक्षा व डंपर यांचा भीषण अपघात झाला होता. माणगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरातील या विद्यार्थिनी रिक्षाने खेड भरणे येथे डीएडच्या परीक्षेसाठी गेल्या होत्या. परीक्षा आटोपून परतत असताना हा अपघात झाला. कशेडी घाटातील चोळई गावच्या वळणावर वाळूने भरलेला डंपर रिक्षावर उलटला. त्यात चिरडून चौघांचा मृत्यू झाला होता.
चौपदरणीकरणात नवीन तयार करण्यात येत असलेल्या बोगद्यामुळे महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या दोन-तीन वर्षांत या घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे, तर दुसरीकडे घाटात तात्पुरते खड्डे भरण्याचे दिखाऊपणाचे काम करण्यात आल्याची ओरड होत आहे. सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. अवजड वाहतूक करणारे अनेक वाहनचालक इंधन वाचवण्यासाठी आपले वाहन न्युट्रल करून घाट उतरत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
मात्र, यामुळे हे वाहनचालक आपल्या व इतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जिवाशी खेळत असल्याचे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याबाबत वाहनचालकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे, याचबरोबर रखडलेल्या बोगद्याच्या कामाला गती देणे आवश्यक आहे. बोगद्याचे काम लवकर पूर्ण झाल्यास हा मार्ग अधिक सुखकर होण्यास मदत होणार आहे.
- २५ जानेवारी २०१९ रोजी रत्नागिरीचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते.
- घाटाला पर्याय असलेल्या बोगद्याच्या कामाची तीस महिन्यांची मुदत डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास तत्कालीन बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला होता.
- वारंवार होणाऱ्या अपघातांच्या घटनांनंतरही कशेडी घाटात पुरेशी उपाययाेजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढतच आहे.