रत्नागिरी तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:33 AM2021-04-22T04:33:12+5:302021-04-22T04:33:12+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात रत्नागिरी तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असून, आतापर्यंत १२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील ...
रत्नागिरी : जिल्ह्यात रत्नागिरी तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असून, आतापर्यंत १२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील एकूण ४,५६४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यातील ३४७९ रुग्ण बरे झाले आहेत. आरोग्याच्या सुविधा अधिक असल्या तरी शहरी भागात लोकांचा रस्त्यावरील वावर अधिक असल्याने येथे संसर्गाचे प्रमाण अधिक आहे.
रत्नागिरी तालुक्यात आरोग्य विभागात कर्मचारी कमी असले तरी जे कर्मचारी आहेत ते २४ तास रुग्णांसाठी राबत आहेत. तालुक्यात सुरुवातीपासूनच रुग्णांची संख्या जास्त आहे. कोरोनाचा प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात जिल्हाभरातून रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात काेरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्यात येत होते. जिल्ह्यात सर्वप्रथम गुहागर तालुक्यात आणि नंतर रत्नागिरी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यावेळी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या भागात आरोग्य कर्मचारी घरोघरी सर्वेक्षण करत असताना काही आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यातच कोरोना महामारीमध्ये सेवा बजावत असताना कोरोनाची लागण होऊन बालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप मोरे यांचा मृत्यू म्हणजे मनाला चटका देणारी घटना होती. नोव्हेंबरपासून घटलेली रुग्णसंख्या मार्चपासून पुन्हा वाढू लागली. एप्रिल महिन्यात रत्नागिरी तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याची संख्या जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा जास्त आहे. लसीकरणही मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून, डॉ. गावडे स्वत: वेळोवेळी लसीकरण केंद्रांना भेटी देऊन लक्ष ठेवून आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण आल्यानंतर त्यांच्या संपर्कात येणारे तसेच त्यांच्या आजूबाजूच्या सुमारे २५ ते ३० जणांची तपासणी आराेग्य कर्मचारी करीत असल्याने रुग्ण वाढीमुळे त्यांची दमछाक होत आहे. रुग्णसंख्या जास्त असली तरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याची आरोग्य यंत्रणा सक्षमपणे काम करीत आहे. तालुक्यामध्ये सध्या ५११ कोरोना रुग्ण गृह अलगीकरणात असून, ४५२ रुग्ण कोविड रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
पोलीस यंत्रणेचे सहकार्य
रत्नागिरी तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. आरोग्य यंत्रणेच्या पोलीस यंत्रणाही खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. कडाक्याच्या उन्हामध्ये राहून विनाकारण फिरणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करीत आहेत. त्याचबरोबर आता शिक्षकही कोरोनामध्ये काम करून आरोग्य यंत्रणेला साथ देत आहेत.
२१ दिवसात १४९४ रुग्ण
एप्रिल महिन्यामध्ये कोरोनाच्या मृतांच्या संख्येत तसेच रुग्णवाढीच्या संख्येत रत्नागिरी तालुक्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या २१ दिवसांमध्ये तालुक्यातील १४९२ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असून, २७ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.