कोरोना साठीच्या घरात...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:20 AM2021-06-27T04:20:53+5:302021-06-27T04:20:53+5:30
गेल्या सव्वा वर्षापासून रत्नागिरी जिल्ह्याची कोरोनाशी लढाई सुरू झाली आहे. जिल्ह्यात १८ मार्च रोजी सापडलेल्या शृंगारतळी (ता. गुहागर) येथील ...
गेल्या सव्वा वर्षापासून रत्नागिरी जिल्ह्याची कोरोनाशी लढाई सुरू झाली आहे. जिल्ह्यात १८ मार्च रोजी सापडलेल्या शृंगारतळी (ता. गुहागर) येथील पहिल्या कोरोना रुग्णाने अवघा जिल्हा हादरला आणि जिल्हा प्रशासनाबरोबरच आरोग्य विभागाची झोप उडविली. त्यानंतर १८ दिवसांनी म्हणजे १८ एप्रिल रोजी दुसरा रुग्ण सापडला. एप्रिलअखेर एकूण रुग्णांची संख्या होती ६ आणि मृत्यू झालेल्यांची संख्या होती एकच. मार्च आणि एप्रिल या महिन्यातील रुग्णसंख्या आणि मृत्यूची संख्या याची या महिन्यांच्या अनुषंगाने वर्षभराची तुलना केली तर मार्च २०२१ पर्यंत असलेली संख्या आणि एप्रिल २१ पर्यंत असलेली संख्या दुपटीपेक्षा अधिक झाली आहे. एप्रिल २०२० मध्ये असलेली रुग्णांची संख्या आता पाच आकडी आणि मृत्यूची संख्या चार आकडी झाली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत लोकांना लाॅकडाऊनच्या काळात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. ही परिस्थिती बऱ्यापैकी रूळावर येत असतानाच जिल्ह्यासह राज्यातच नव्हे तर देेशातच कोरोनाची दुसरी लाट थडकली. पहिल्या लाटेत शहरांमध्येच बाधित होणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. मात्र, दुसऱ्या लाटेत तर गावांमध्येही मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरला. मृत्यूचे जणुकाही तांडवच सुरू झाले आहे. कुणाच्या घरात किती रुग्ण सापडतील, हे सांगता येत नाही. अनेक जवळचे नातलग, मित्रपरिवार, आप्त जाताना पाहून जगण्यावरचा विश्वासच उडाला आहे. गेल्या तीन महिन्यांत सुरू असलेल्या दुसऱ्या लाटेने प्रत्येकाच्या मनात भीतीचा गोळा निर्माण केला आहे. कोरोना रुग्ण आणि कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या थाेपविणे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठाकले आहे. यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाच्या मदतीने प्रभावी उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. उपचारासाठी उशिरा येण्यामुळे, तसेच कोमाॅर्बीड रुग्ण बाधित होत असल्यामुळे रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच आता इतर आजारांच्या रुग्णांचे बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. श्वसनाचा त्रास वाढला आहे. त्यामुळे आता ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. वाढत्या रुग्णसंख्येला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजन साठा आणि ऑक्सिजन बेड याकडे लक्ष केंद्रित केले आहे.
वर्ष रुग्ण मृत्यू
१८ मार्च २० १ ०
३१ मार्च २१ अखेर ११०२९ ३७७
एप्रिल २० अखेर ६ १
एप्रिल २१ २२२८३ ६५६
मे २० अखेर २८६ १०
मे २१ अखेर ३६४३९ १२३९
जून २० अखेर ६२० ६१
२५ जून २१ अखेर ५९५६३ १७०४
गेल्या जून महिन्यापासून आतापर्यंत ५९ हजारांनी वाढ
जून २०२० अखेर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या हाेती ६२० आणि कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या होती ६१. मात्र, या जून महिन्यापर्यंत (२५ जून) रुग्णसंख्या ५८,९४३ ने वाढली आहे. तर वर्षभरातच १६४३ जणांचे मृत्यू झाले आहेत.
आरोग्य यंत्रणा हवालदिल
आरोग्य यंत्रणेकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने गेल्या दीड वर्षात ही यंत्रणा थकली आहे. तरीही नेटाने प्रयत्न सुरू आहेत. लोकांकडून दाखविण्यात आलेल्या बेफिकिरीमुळे आणि कोरोना आजार लपविण्यामुळे त्याचा संसर्ग वाढतो आहे; पण त्याचबरोबर उशिरा उपचारासाठी येण्याने मृत्यूदराचा आलेखही वाढतोय.
नागरिकांनी बेफिकिरी झटकण्याची गरज (कोटसाठी)
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आता ६० हजारांपर्यंत पोहोचली आहे. आरोग्य विभाग दिवसरात्र काम करीत आहे. त्यामुळे आता बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५१,१६२ रुग्ण २५ जूनअखरेपर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र, काही लोक उशिरा उपचारासाठी दाखल होत असल्याने मृत्यू वाढलेले दिसतात. तसेच नागरिक अजूनही मास्कचा वापर करत नसल्याने तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढतोय. नागरिकांनी आता तरी खबरदारी घ्यायला हवी. तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी हे गरजेचे आहे.
-डाॅ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी