घराला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:29 AM2021-04-15T04:29:52+5:302021-04-15T04:29:52+5:30
पाली : रत्नागिरी तालुक्यातील नाणीज गुरववाडी येथे वनिता गुरव यांच्या घराला आग लागून सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले ...
पाली : रत्नागिरी तालुक्यातील नाणीज गुरववाडी येथे वनिता गुरव यांच्या घराला आग लागून सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. राकेश गुरव, प्रकाश गुरव, सोपान गुरव आदी ग्रामस्थांनी एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझविण्याचा प्रयत्न केला. घरातील फर्निचर, कपडे, कागदपत्रे आदी जळून गेले आहे.
ज्येष्ठ महिलांचा सत्कार
खेड : गोवंडी येथील दत्तनगर भागात हमारी सहेली या संस्थेच्या सहकार्याने महिला व मुलांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. संस्थेच्या अध्यक्षा मुंब्रादेवी कानडी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती करून दिली. यावेळी महिला आणि कार्यकर्त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
जनजागृती मोहीम
रत्नागिरी : कोरोना लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये माहिती व्हावी यासाठी येथील नेहरु युवा केंद्राने व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. आरोग्य विभागामार्फत विविध केंद्रात लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लसीकरणाबाबत नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळावा यासाठी ही जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.
डांबरीकरणाचा शुभारंभ
आवाशी : खेड तालुक्यातील तिसे मोहल्ला येथील कब्रस्तानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरणाचा शुभारंभ माजी आमदार संजय कदम यांच्या हस्ते नुकताच झाला. यावेळी तिसेचे माजी सरपंच सय्यद तिसेकर, राजू मोहाने, अश्रफ दादरकर, जिन्नत तिसेकर, रियाज तिसेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रस्त्याची दुरवस्था
खेड : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी ठरु शकेल अशा वेरळ - भोस्ते शिवबोरज रस्ता कामासाठी तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी १४ कोटींचा निधी मंजूर केला होता; मात्र गेल्या पाच वर्षांपासून या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत ठेवण्यात आले आहे. झालेले कामही निकृष्ट असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
रत्नागिरी : जिल्ह्यातील १० वी आणि १२ वी परीक्षेशी संबंधित असणारे माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे लसीकरण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना नुकत्याच दिल्या आहेत. त्यामुळे आता या लसीकरणाला प्रारंभ होणार आहे.
मोकाट जनावरांचा संचार
सावर्डे : सध्या चिपळूण ते सावर्डे महामार्गावर मोकाट जनावरांचा संचार पुन्हा वाढला आहे. मध्यंतरी चिपळूण शहरातील भटकी गाढवे आणि मोकाट जनावरे यांच्या बंदोबस्तासाठी नगरपालिका प्रशासनाने कठोर नियोजन करून या जनावरांना आळा घातला होता; मात्र आता लॉकडाऊनच्या काळात नागरिक घरात आणि मोकाट जनावरे रस्त्यावर अशी स्थिती झाली आहे.
शैक्षणिक साहित्याचे वाटप
गुहागर : तालुक्यातील अडूर येथील श्री विठ्ठलादेवी ग्रामविकास मंडळ, मुंबई विश्वस्त मधूचंद्रा मुख्योधामतर्फे गावातील माध्यमिक विद्यालय व प्राथमिक केंद्रीय शाळा क्रमांक १ मध्ये मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसांचे मार्गदर्शन शिबीरही घेण्यात आले.
उन्हाचा चटका वाढतोय
रत्नागिरी : कोकणात आता उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. दिवसाबरोबरच रात्रीच्या किमान तापमानाचा पाराही सरासरीच्यावर राहू लागला आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात या बदलत्या वातावरणाचा धोका असल्याचे आरोग्य विभागाकडून सुचित करण्यात आले आहे.
उद्योजक चिंतेत
रत्नागिरी : वर्षभरात पुन्हा आता दीर्घकाळ लॉकडाऊन सुरू होणार असल्याने सर्व उद्योग बंद राहणार आहेत. कारखान्यातील कामगारांची सोय लगत असेल तरच उद्योग सुरु ठेवण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्याने कारखानदार अडचणीत आले आहेत. त्यामुळे आता पुन्हा होणाऱ्या लॉकडाऊनने उद्योजकांना चिंतेत टाकले आहे.