चिपळुणात केरळच्या धर्तीवर मिळणार हाउसबोटची सुविधा, पर्यटकांना निसर्गसौंदर्याची अनुभूती घेता येणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 01:18 PM2024-09-28T13:18:28+5:302024-09-28T13:18:54+5:30

मालदोली महिला बचत गट राबवणार उपक्रम 

Houseboat facilities will be available in Chiplun on the lines of Kerala, tourists can experience the natural beauty | चिपळुणात केरळच्या धर्तीवर मिळणार हाउसबोटची सुविधा, पर्यटकांना निसर्गसौंदर्याची अनुभूती घेता येणार 

चिपळुणात केरळच्या धर्तीवर मिळणार हाउसबोटची सुविधा, पर्यटकांना निसर्गसौंदर्याची अनुभूती घेता येणार 

चिपळूण : कोकणातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी, तसेच बचत गटांच्या महिलांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने वाशिष्ठी दाभोळ खाडीत हाउसबोटचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. मालदोली प्रभाग संघाच्या महिला हा प्रकल्प राबवणार आहेत. या खाडीत सफर करताना केरळपेक्षाही अप्रतिम निसर्गसौंदर्याची अनुभूती पर्यटकांना घेता येणार आहे.

पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात पाच ठिकाणी हाउसबोट प्रकल्प सुरू होत आहे. त्यामध्ये चिपळूण येथील वाशिष्ठी दाभोळ खाडीचाही समावेश आहे. या खाडीतील जैवविविधता, मगर सफारी, पांडवकालीन लेणी, गरम पाण्याचे कुंड, कांदळवणाची बेटे, नारळी पोफळीच्या बागा या निसर्गरम्य परिसराचा अनुभव या हाउसबोटीतून घेता येईल. एक कोटी खर्चाच्या या हाउसबोटमध्ये दोन वातानुकूलित खोल्या असून, त्यात प्रशस्त बेड, सोफा, बाथरूमची व्यवस्था आहे. हा प्रकल्प सुरळीतपणे चालण्यासाठी सहभागी ३६ महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

सर्वसाधारण हाउस बोटिंगमध्ये पर्यटकांसाठी खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. वर्षाकाठी एक ते दीड कोटींची उलाढाल या प्रकल्पातून अपेक्षित आहे. हा प्रकल्प सुरळीतपणे सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उमेदच्या अधिकाऱ्यांनी, तसेच सहभागी महिलांनी केरळमधील हाउस बोट प्रकल्पाची पाहणी केली आहे.

चार समित्यांच्या स्थापना 

मालदोली येथील अग्निपंख महिला प्रभाग संघ हा प्रकल्प राबवणार आहे. या प्रभाग संघात ३५५ स्वयंसाहाय्यता समूह १८ ग्रामसंघ, तर ३,८४७ महिला सहभागी आहेत. सिंधुरत्न योजनेतून हा प्रकल्प लवकरच सुरू होत आहे. प्रकल्प सुरळीतपणे चालण्यासाठी या महिलांच्या व्यवस्थापन, देखरेख, विपणन, लेखा अशा चार समित्यांच्या स्थापना केल्या आहेत.


वाशिष्ठी दाभोळखाडीत नयनरम्य असा निसर्ग परिसर आहे. पर्यटकांनी हाउस बोटमधून निसर्गाची पाहणी केल्यास पुन्हा ते सातत्याने इकडे आकर्षित होतील, अशी निसर्गाची उधळण येथे पाहायला मिळते. हा प्रकल्प यशस्वीपणे आम्ही राबवू, असा आम्हाला विश्वास आहे. - दीपिका कुळे, अध्यक्ष, अग्निपंख महिला प्रभाग संघ, मालदोली

Web Title: Houseboat facilities will be available in Chiplun on the lines of Kerala, tourists can experience the natural beauty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.