रत्नागिरीत महिला चालविणार हाऊसबोट, महिलांना सक्षम करण्यासाठी सिंधुरत्न योजनेचा लाभ
By शोभना कांबळे | Published: January 27, 2024 01:43 PM2024-01-27T13:43:32+5:302024-01-27T13:44:06+5:30
रत्नागिरी : सिंधुरत्न ही ऐतिहासिक योजना आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी या योजनेमधून हाऊसबोट देण्यात आली आहे. त्यामुळे आता महिलांनी ...
रत्नागिरी : सिंधुरत्न ही ऐतिहासिक योजना आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी या योजनेमधून हाऊसबोट देण्यात आली आहे. त्यामुळे आता महिलांनी चालविलेली हाऊसबोट येणाऱ्या पर्यटकांना पहायला मिळेल. जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी याचा निश्चित उपयोग होईल, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी येथील छतपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे प्रजासत्ताक दिनी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला.
पर्यटनाच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्हा महत्त्वाचा जिल्हा आहे त्यादृष्टीने प्राणी संग्रहालयाच्या कामास सुरुवात झाली आहे. देशातला पहिला थ्रीडी मल्टीमीडिया शो येथे होत आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्यातील सर्वात उंच पुतळ्याचा लोकार्पण सोहळा ४ तारखेला होत आहे.
पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होण्यासाठी एकत्र काम करतोय. सर्वसामान्य माणसाला विमान प्रवास करता यावा, यासाठी रत्नागिरीतील विमानतळ विकसित होत आहे. विमिनतळ टर्मिनल इमारतीसाठी १०० कोटी राज्याने मंजूर केले आहेत. लवकरच सर्वसामान्य माणसाच्या सेवेत हे दाखल होईल आणि त्याला विमान प्रवास करता येईल. विकासाची अनेक कामे करत असताना मंडणगड, चिपळूण, दापोली, गुहागर, संगमेश्वर असेल त्याचबरोबर अन्य ९ शहरांच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याचे काम शासनाने केले आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.
काजू बोर्डाचे ५ वर्षासाठी १३०० कोटी मंजूर केले आहेत. आंबा बोर्ड असावे, अशी आंबा बागायतदारांची मागणी होती, त्याला तत्वता मान्यता दिली आहे. त्याचबरोबर साडेनऊ कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला असून लवकरच आंबा बागायतदारांच्या खात्यात जमा होतील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
या कार्यक्रमात दैनंदिनी रोशन आंबेकर हिला जिल्हा माहिती कार्यालयातील शिपाई पदावर पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे यांनी याबाबत पालकमंत्र्यांना माहिती दिली. महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाच्या जिल्हास्तरीय विजेते निलिमा आखाडे, ज्युली रहाटे, रिध्दी माळी, मृण्मयी चिंचचौरे, साक्षी आंब्रे, गौरव सावंत, स्वरुप शिरगावकर, मानस गावकर, श्रृती पडघन, यश खामकर यांना प्रत्येकी १ लाख बीज भांडवल व प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत योजनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे जिल्हा शासकीय रुग्णालय आणि बी. के. एल. वालावलकर यांना प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यांनतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले.