घरे बांधता येईनात आणि परवानगीही मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:30 AM2021-05-15T04:30:48+5:302021-05-15T04:30:48+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क आरवली : संगमेश्वर तालुक्यातील राजीवली काळंबेवाडी गावठाण गडनदी बाधित असल्याने, या वाडीचे पुनर्वसन करणे अपेक्षित आहे. ...

Houses could not be built and permission was not obtained | घरे बांधता येईनात आणि परवानगीही मिळेना

घरे बांधता येईनात आणि परवानगीही मिळेना

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील राजीवली काळंबेवाडी गावठाण गडनदी बाधित असल्याने, या वाडीचे पुनर्वसन करणे अपेक्षित आहे. त्यांचा पुनर्वसन प्रश्न ज्वलंत बनत चालला आहे. गावठाणातील जुनी घरे मोडकळीस आली असून, पुनर्वसन प्रक्रियेमुळे नवीन घरे बांधणे शक्य नाही. त्यामुळे जुन्या मोडकळीस आलेल्या धोकादायक घरातच राहण्याची वेळ येथील कुटुंबावर आली आहे. मोडकळीस आलेल्या घरांमुळे पावसाळ्यात कधी अपघात घडेल, याची खात्री नसल्याने जीव मुठीत धरुन राहण्याची वेळ काळंबेवाडी येथील प्रकल्पग्रस्तांवर आली आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी तातडीने बैठक घेऊन उपाययोजना करण्याची मागणी उपसरपंच संतोष येडगे यांनी केली आहे.

राजीवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील काळंबेवाडी पुनर्वसन गावठाणातील नागरी सुविधा कामे मार्गी लावण्यासाठी रत्नागिरी पाटबंधारे मंडळाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर यांनी १८ ऑगस्ट, २०२० रोजी आपल्या दालनात उपसरपंच संतोष येडगे आणि प्रकल्पग्रस्तांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत काळंबेवाडी पुनर्वसन गावठाण आणि इतर पुनर्वसन गावठाणासंदर्भात चर्चा करण्यात आली. या चर्चेनुसार मार्च, २०२१ पर्यंत सर्व नागरी सुविधा कामे पूर्ण करुन गावठाण हस्तांतरित करण्याचे आश्वासन अधीक्षक अभियंता वैशाली नारकर यांनी बैठकीत दिले होते. काळंबेवाडी गावठाणात ७८ कुटुंबांची भूखंडासाठी मागणी आहे. सध्या ६३ भूखंड तयार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली होती. भूखंडाची वाढीव मागणी लक्षात घेऊन गावठाण सपाटीकरणाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. भूखंड सपाटीकरण करताना दोन भाग बनविण्यात आले आहेत. ‘अ’ मध्ये ३१ तर ‘ब’ मध्ये ३२ भूखंड तयार करण्यात आले आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार भूखंड वाटप होणे शक्य नसल्याने आणि सपाटीकरण केलेला भाग डोंगराचा असल्याने, व्यवस्थित गावठाणाची निर्मिती करायची झाल्यास, आणखी सपाटीकरण करावे लागेल, असा मुद्दा या बैठकीत उपस्थित केला होता. पुनर्वसन गावठाणातील विद्युतविषयक कामे तातडीने करून देण्याची कार्यवाही करावी. यासाठी लागणारा निधी महावितरणला वर्ग करून महावितरणच्या माध्यमातून दर्जेदार विद्युतविषयक कामे करण्याची मागणी करण्यात आली होती.

गावठाणातील अंतर्गत रस्ते, उघडी गटारे, भूखंडासाठी संरक्षण भिंती, कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेल्या रस्त्यांचे होणारे भूस्खलन थांबविण्यासाठी संरक्षण भिंती बांधणे, नळपाणीपुरवठा योजना, उघडी विहीर, शिर्केवाडी येथील मंदिराचा भूखंड ताब्यात देणे आणि त्यांना वीज कनेक्शन देण्यासाठी आवश्यक नाहरकत प्रमाणपत्र देणे, काळंबेवाडी गावठाणातील शाळेच्या ८ पैकी चार वर्गखोल्यांवरील पत्रे काढून त्या ठिकाणी स्लॅब टाकणे, काळंबेवाडी गावठाणातील शौचालयांची दुरुस्ती कामे, पाण्याच्या टाकीची गळती थांबविणे आदी मुद्द्यांवर तातडीने कार्यवाही करत, नागरी सुविधा कामांना सप्टेंबर अखेरपर्यंत केवळ १ महिन्यात मंजुरी घेण्याचे निर्देश अधीक्षक अभियंता वैशाली नारकर यांनी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव यांना दिले होते. मात्र, मार्च, २०२१ उजाडला तरी अद्याप कामात गती न आल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी आहे.

अधीक्षक अभियंता वैशाली नारकर यांनी आपल्या कार्यालयात घेतलेल्या बैठकीत विभागीय कार्यालयाला कामासंदर्भात डेडलाइन देण्यात आल्या होत्या. रत्नागिरी पाटबंधारे मंडळाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर यांनी दिलेल्या तारखांनुसार निविदा प्रक्रिया, प्रापणसूची मंजुरी, कार्यारंभ आदेश देणे ही कामे १५ नोव्हेंबर, २०२० अखेर पूर्ण करणे, डिसेंबर अखेरपर्यंत यांत्रिकी विभागामार्फत जमीन सपाटीकरण कामे पूर्ण करणे, तर विद्युतविषयक कामे जानेवारी अखेरपर्यंत करावीत, ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्यक्ष कामे मार्च, २०२१ पर्यंत पूर्ण करून मे, २०२१ पर्यंत गावठाण हस्तांतरित करण्याचा आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्यात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना अपयश आले आहे. प्रकल्पग्रस्त या अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत, तर या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने हस्तक्षेप करून पाटबंधारे विभागाला निर्देश देण्याची मागणी होत आहे.

Web Title: Houses could not be built and permission was not obtained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.