घरबांधणी महागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:27 AM2021-04-05T04:27:24+5:302021-04-05T04:27:24+5:30
रत्नागिरी : कोरोना महामारीमुळे राज्य शासनाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शासनाकडून महसूल वाढीसाठी आता वाळू उत्खनन, गौणखनिजांच्या रॉयल्टीत ...
रत्नागिरी : कोरोना महामारीमुळे राज्य शासनाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शासनाकडून महसूल वाढीसाठी आता वाळू उत्खनन, गौणखनिजांच्या रॉयल्टीत दीडपटीने वाढ करण्यात येणार आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात चिरा, वाळू आदींसह बांधकाम साहित्य महागणार आहे.
टँकरद्वारे पाणीपुरवठा
चिपळूण : तालुक्यातील धामणवडेसह टेरव गावात निर्माण झालेल्या पाणी टंचाईग्रस्तांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. धामणवडे गावातील बौध्दवाडी, दत्तवाडी, शिगवणवाडी, दोणेवाडी, हळंदबावाडी, पिटलेवाडी आदी सहा वाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
शीतल शिंदे यांची निवड
लांजा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लांजा तालुका युवती अध्यक्षपदी शीतल शिंदे, तर शहराध्यक्षपदी प्रतीक्षा गजानन गुरव यांची निवड करण्यात आली आहे. शिंदे व गुरव यांना नियुक्तीचे पत्र आमदार शेखर निकम यांच्याहस्ते वितरित करण्यात आले.
नाखरे शाळेचा सन्मान
रत्नागिरी : तालुक्यातील नाखरे येथील प्राथमिक शाळेला जिल्हा परिषदेकडून आदर्श शाळा पुरस्कार वितरित करण्यात आला आहे. पंचायत समिती सदस्य सुनील नावले यांच्याहस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेतर्फे सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
नोंदणीसाठी शिथिलता
रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ६० वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ४५ वर्षांच्या पुढील सर्वांना सर्व शासकीय रुग्णालयांत मोफत लस देण्यात येत आहे. विशेष म्हणजे आता ऑनलाईन आगाऊ रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.
अरविंद तावडे यांची निवड
राजापूर : तालुक्यातील मोसम येथील युवक अरविंद तावडे यांची रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेस महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे पाटील यांच्या उपस्थित प्रदान करण्यात आले.
माकडांचा उपद्रव
राजापूर : तालुक्यातील मळे शेती, आंबा, काजू बागायतीमध्ये माकडांचा उपद्रव वाढला असून माकडे पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. कुळीथ, पावटा, भाजीपाला पिकात शिरून पिकाची नासाडी करीत आहेत. शिवाय तयार आंबे खाऊन फेकत आहेत. नारळीवरील नारळांचेही नुकसान करीत आहेत.
मोकाट जनावरांचा उपद्रव
राजापूर : शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे. शहरातील गणेशघाट परिसरातील शिवाजीपथावर दर गुरुवारी आठवडा बाजार भरतो. बाजारासाठी नागरिक येत असतात. मोकाट गुरे बाजारात शिरून ग्राहकांना धडक देत असल्याने भीती निर्माण झाली आहे.
शौर्य गावसचे यश
खेड : इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड फाऊंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल गणित परीक्षेत भरणे बाईतवाडी येथील रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूलचा विद्यार्थी शौर्य गावस याने राज्यात पाचवा क्रमांक पटाकाविला आहे. सुवर्णपदक, सन्मानचिन्ह व रोख बक्षीस देऊन शौर्यचा गौरव करण्यात आला.