कोरोनाला ‘कॅज्युअल’ घेऊन कसं चालेल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:31 AM2021-04-01T04:31:55+5:302021-04-01T04:31:55+5:30
गेले वर्षभर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वृत्तपत्रातून विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून, विचारमंथनातून, शासनाच्या जनजागृतीसाठी असलेल्या विविध मोहिमेतून, आराेग्य विभागाच्या विविध अभियानातून ...
गेले वर्षभर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वृत्तपत्रातून विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून, विचारमंथनातून, शासनाच्या जनजागृतीसाठी असलेल्या विविध मोहिमेतून, आराेग्य विभागाच्या विविध अभियानातून कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. म्हणूनच कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना या सर्व यंत्रणांना यशस्वीरीत्या करता आला. गेल्या वर्षापासून शासनाने प्रशासन आणि आरोग्य विभागासह विविध यंत्रणा यांच्या सहकार्याने अथक मेहनतीने कोरोनावर यश मिळविले. हे सारे प्रयत्न नागरिकांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी होते. पण दुर्दैव असे की, आमच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी कायदे, नियम करावे लागतात. यंत्रणांना रस्त्यावर दिवसरात्र, उन्हातान्हात उभे रहावे लागते. या यंत्रणांना त्याचा पगाराच्या रूपात कामाचा माेबदला मिळतो. मग काय झाले, त्या उभ्या राहिल्या तर, असं सरसकट असंवेदनशील विधान करून आपण मोकळे होतो.
तसं पाहिलं तर प्रत्येकालाच आपला जीव प्रिय असतो. मृत्यूचं नुसतं नाव निघालं तरी भीतीने घाम फुटतो. प्रत्येकालाच मृत्यूचे नावही अशुभ वाटते. ज्यांच्या घरातील आप्तांचे बळी कोरोनाने घेतले आहेत, त्यांची अवस्था कशी आहे, ती ज्यांची त्यांनाच माहीत. कोरोनाने सर्व नाती खोटी ठरवली असून, मृत्यू हेच शाश्वत असल्याचे दाखवून दिले आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांचे अखेरचे दर्शनही त्यांच्या आप्तांना झालेले नाही. गेल्यावर्षी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात अक्षरश: कोरोनाचे थैमान सुरू होते. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबरच वाढत्या मृत्युदराने जिल्ह्याची झोप उडाली होती. म्हणूनच आता पुढचा काळ कोरोना संक्रमण वाढविण्याच्या दृष्टीने पूरक ठरणारा असा आहे. म्हणूनच आता तरी आपण कोरोनाला सहजगत्या न घेता, गांभीर्याने घ्यायला हवे.
गेल्या वर्षभरात जिल्ह्यातच नव्हे तर अवघ्या जगात कोरोनाने केलेली हानी न विसरता येण्यासारखी आहे. त्याचे परिणाम अजूनही सादृश्य स्वरूपात आहे. आर्थिक बाबीत आपण कित्येक वर्षे मागे गेलो आहोत, म्हणूनच आता पुन्हा हा धोका नको. त्यासाठी लाॅकडाऊन पुन्हा झाले तर ते परवडण्यासारखे नाही, याचे भान आतातरी साऱ्यांनीच बाळगायला हवे.