महापुरातील वाहनांचे नुकसान कसे भरून निघणार; महाडमध्ये वाहनांच्या दुरुस्तीला रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 07:26 PM2021-08-10T19:26:10+5:302021-08-10T19:26:20+5:30
रस्त्यावर असलेली वाहने एकमेकावर आपटली. अनेक वाहने गटारात वाहून गेली. कार आणि मोटारसायकल दोन्ही प्रकारची वाहने यामध्ये बाधित झाली.
- सिकंदर अनवारे
दासगाव: महाडमध्ये आलेल्या महापुरात शहरातील प्रत्येक वाहन पुराच्या पाण्यात अडकले. वाहनांची पाण्याच्या प्रवाहात पडझड झाल्याने नुकसान देखील झाले. वाहनांची दुरुस्ती करण्यासाठी महाडमध्ये रांगा लागल्या आहेत. काही गॅरेज चालक फ्रि सेवा देत आहेत. महाडमध्ये आलेल्या पुराने संपूर्ण शहरात हाहाकार माजवला. यामुळे मोठ्या प्रमाणात तालुक्यात जीवितहानी आणि शहरात वित्तहानी झाली आहे. शासकीय मालमत्तेचे देखील या पुरात नुकसान झाले आहे. शहरात असलेल्या वाहनांची तर पुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाताहत झाली. रस्त्यावर असलेली वाहने एकमेकावर आपटली. अनेक वाहने गटारात वाहून गेली. कार आणि मोटारसायकल दोन्ही प्रकारची वाहने यामध्ये बाधित झाली.
पुराच्या पाण्यात किमान दोन दिवस ही वाहने तशीच राहिली त्यातच मोठ्या प्रमाणावर चिखल असल्याने हा चिखल वाहनांच्या विविध भागात जावून साचला. यामुळे इलेक्ट्रोनिक यंत्रणा बंद पडल्या आहेत. गाडीतील सीट कव्हर, रुफ कव्हर, हॉर्न, इंधन टाक्या, हेडलाईट, ब्रेक, ई.सी.एम, वायरिंग, सेन्ट्रल लॉकिंग, क्लच प्लेट, आदी भाग नादुरस्त झाले आहेत. त्यातच कांही वाहनांना विमा कव्हर असल्याने अनेकांनी वाहने कांही दिवस तशीच ठेवली आहेत त्यामुळे वाहनांचे अधिक नुकसान झाले आहे.
महाड शहरात साधारणपणे छ.शिवाजी चौक, काकरतळे, सुकटगल्ली, मुख्य बाजारपेठ, आदी भागात कांही प्रमाणात पुराचे पाणी येते. सन २००५ मध्ये छ.शिवाजी चौक ते एस.टी.स्थानक मार्गावर देखील साधारण एक फुट पाणी आले होते. त्यातच महाडमधील नवेनगर परिसरातील शासकीय धान्य दुकान गोदाम, महाड तहसील कार्यालय (कोट आळी), महाड एस.टी.स्थानक, छ. शिवाजी मार्ग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, चवदारतळे या परिसरात पुराचे पाणी शक्यतो येत नाही.
दरवर्षाचा हा अनुभव असल्याने यावर्षी देखील दिवसभर आलेल्या पुराच्या पाण्याआधी नागरिकांनी आपली वाहने याठिकाणी आणून ठेवली. मात्र हा अनुभव यावेळी मात्र फिका पडला. पुराच्या पाण्याने वाहनांना देखील सोडले नाही. कांहीजणांनी कर्ज काढून वाहने घेतलेली होती तर कांहीनी सेवानिवृत्त होत कुटुंबाची आवड म्हणून आवडीचे वाहन घेतले होते. प्रत्येकाने आपली गरज ओळखत वाहने घेतली मात्र आवडीच्या वाहनावर पुराने पाणी फिरवले. वाहनांची अवस्था पाहून अनेकांचे चेहरे रडवेले झाले आणि वाहनांचे हे नुकसान कसे भरून काढायचे असा प्रश्न प्रत्येकाला पडला.
वाहने घेताना आपण विमा काढलाच पाहिजे मात्र महाड मधील गेली कांही वर्षाची स्थिती पाहता सातत्याने पुराच्या पाण्यात वाहने जात आहेत. यामुळे विमा कंपन्या देखील आता येथील उत्पन्न आणि द्यावा लागणारा मोबदला याचा विचार करेल. भविष्यात आपली वाहने पूर परीस्थिती पाहता वाहन कसे सुरक्षित राहील याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे – ललित खातू विमा सल्लागार महाड
वाहन पुराच्या पाण्यात गेल्याने वाहनाच्या प्रत्येक भागात चिखल गेला आहे. यामुळे संपूर्ण वाहन खोलून चिखल पाणी काढून टाकणे हे मुख्य काम आहे. वाहनातील इलेक्ट्रोनिक पार्ट यामध्ये शक्यतो खराब होतात. यामुळे नवीन टाकणे उत्तम असते. पूर्ण दुरुस्तीनंतर वाहन पुन्हा रस्त्यावर धावेल – विनोद कातरे शिंदे मोटर्स महाड