पाऊस तोंडावर लॉकडाऊनमुळे शेतीची कामे करायची कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:22 AM2021-06-03T04:22:54+5:302021-06-03T04:22:54+5:30

चिपळूण : जिल्ह्यात गुरूवारपासून कडक लॉकडाऊन केले जाणार आहे. मात्र, पावसाळा जवळ आल्यामुळे शेतीची कामे कशी होणार, असा प्रश्‍न ...

How to do farm work due to rain lockdown? | पाऊस तोंडावर लॉकडाऊनमुळे शेतीची कामे करायची कशी?

पाऊस तोंडावर लॉकडाऊनमुळे शेतीची कामे करायची कशी?

Next

चिपळूण : जिल्ह्यात गुरूवारपासून कडक लॉकडाऊन केले जाणार आहे. मात्र, पावसाळा जवळ आल्यामुळे शेतीची कामे कशी होणार, असा प्रश्‍न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. पावसाळ्यापूर्वी केली जाणारी रस्ते दुरुस्तीची कामेही लॉकडाऊनमुळे बंद पडणार आहेत. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन केले जात असले तरी त्याची वेळ चुकल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ३ जूनपासून पुढील आठ दिवस लॉकडाऊन जाहीर केले आहे. मात्र, जूनच्या पहिल्या आठवड्यात ग्रामीण भागात शेतीची लगबग सुरू असते. बी-बियाणे, खतांच्या खरेदीसह शेतीची मशागत सुरू असते. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस सुरू झाला की, पेरणीसह इतर कामे सुरू होतात. मशागतीची कामे करण्याच्या कालावधीतच लॉकडाऊन केले जाणार आहे. ग्रामीण भागातही कडक लॉकडाऊनची अमलबजावणी केली जाणार आहे. मग शेतीची कामे कशी होणार, असा प्रश्‍न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम पावसाळ्यापूर्वी केले जाते. जुन्या रस्त्यांची दुरूस्ती आणि नवे रस्ते पावसाळ्यापूर्वी तयार केले जातात. पावसाळा जेमतेम आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. याच दरम्यान लॉकडाऊन केले जाणार असेल तर ही कामे कशी होणार, असा प्रश्‍न नागरिकांमधून विचारला जात आहे. रस्ते दुरूस्ती आणि नवे रस्ते दुरुस्तीचे काम घेतलेल्या ठेकेदारांमध्ये मोठी चिंता आहे. अनेकांची अर्धवट स्थितीत कामे सुरु आहेत. त्यांचे काम पूर्ण झाले नाही तर गैरसोयीमुळे ग्रामस्थांची नाराजी तर असणारच आहे. त्याशिवाय ठेकेदारांचे आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता आहे.

....................

कोरोना कालावधीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेऊन निर्णय घ्यावा, असा सल्ला गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी जिल्हाधिकारी यांना दिला होता. तरीही जिल्हाधिकारी लोकप्रतिनिधींना विश्‍वासात न घेता निर्णय घेत आहेत. त्यांचे निर्णय चुकीचे नाहीत, मात्र निर्णय घेण्याची वेळ चुकीची आहे. त्यामुळे प्रशासनाबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे.

- फैय्याज शिरळकर, शिरळ, चिपळूण

Web Title: How to do farm work due to rain lockdown?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.