जगायचे कसे? घरगुती गॅस पुन्हा २५ रुपयांनी महागला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:21 AM2021-07-04T04:21:34+5:302021-07-04T04:21:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे संकट सुरू असतानाच विविध प्रकारच्या महागाईने डोके वर काढले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे संकट सुरू असतानाच विविध प्रकारच्या महागाईने डोके वर काढले आहे. अन्नधान्ये, कडधान्ये, तेले, भाज्या याचबरोबर इंधनाचे दरही भरमसाठ वाढू लागले आहेत. त्यातच आता घरगुती गॅस सिलिंडरचे दरही भरमसाठ वाढू लागल्याने त्याचा वापर सामान्याच्या आवाक्याबाहेरचा झाला आहे. ग्रामीण जनतेचे तर त्याहून हाल झाले असून गावांमध्ये चुली पेटविण्यासाठी आता सरपणच उपलब्ध नाही.
गेल्या सात महिन्यात घरगुती वापराचा गॅस महागल्याने जगायचे, ही चिंता सामान्यांना सतावू लागली आहे. ग्रामीण भागात उज्ज्वला योजना केवळ नावापुरती उरली आहे. त्यामुळे आता या लोकांनाही महागडा गॅस वापरणे अशक्य झाले आहे.
घर खर्च भागवायचा कसा ?
गेल्या सव्वा ते दीड वर्षापासून कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय बंद आहेत. अजूनही लॉकडाऊनचा फटका बसत आहे. असे असताना सरकारने घरगुती गॅससारख्या जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करून जनतेला दिलासा द्यायला हवा. कोरोनाच्या काळात दर आणखीनच वाढले आहेत. सामान्य माणसाने जगायचे कसे?
- स्मिता बागडे, गृहिणी, रत्नागिरी
गेल्या वर्षापासून अन्नधान्य, तेले, भाज्या यांचे दर भरमसाठ वाढले आहेत. आधीच लोकांचे पगार कमी झाले, काहींचे व्यवसाय ठप्प झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. असं असतानाच कुटुंब पोसायचं कसं, ही चिंता आहे. त्यातच घरगुती गॅसही महागल्याने आता इतर खर्च कसा भागवायचा, ही काळजी आमच्या समोर उभी आहे.
- रेखा सावंत, गृहिणी, रत्नागिरी
पुन्हा चुलीसाठी गावात सरपणही मिळेना
केंद्र सरकारने ग्रामीण भागातील जनतेसाठी उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. सुरुवातीला मोफत गॅस सिलिंडर जोडणीसह मिळाला. आता मात्र, त्यांना गॅस भरण्याचे पैसे द्यावे लागतात.
ग्रामीण भागात रॉकेल मिळत नाही. लाकूडतोड कायद्याने थांबली असल्याने सरपणही मिळत नाही, त्यामुळे चूलही पेटवता येत नाही. गॅस महागला आता जगायचे कसे, असा प्रश्न ग्रामीण गृहिणी विचारत आहेत.
डिसेंबर महिन्यात उच्चांकी वाढ
कोरोनाचे संकट गेल्या मार्चमध्ये आल्याने सरकारने लॉकडाऊन सुरू केले. या काळात मंदीचे सावट असतानाच डिसेंबर २०२० मध्ये घरगुती गॅस सिलिंडर ६०५ रुपयांवरून ६५५ आणि पुन्हा ७०५ रुपये असा झाला. या एकाच महिन्यात १०० ने वाढ झाली.