कोरोनाची तिसरी लाट कशी रोखणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:39 AM2021-07-07T04:39:38+5:302021-07-07T04:39:38+5:30
सध्या जिल्ह्यात इतर वयोगटातील रुग्णांबरोबरच बालके बाधित होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे, ही चिंतेची बाब आहे. अजूनही शाळा, काॅलेज बंद ...
सध्या जिल्ह्यात इतर वयोगटातील रुग्णांबरोबरच बालके बाधित होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे, ही चिंतेची बाब आहे. अजूनही शाळा, काॅलेज बंद असतानाही ही मुले बाधित झाली, याचा अर्थ घरातील व्यक्ती बाहेर जात असल्याने त्यांच्यामुळे ही मुले बाधित होत आहेत. सध्या जिल्ह्याची परिस्थिती चिंताजनकच म्हणायला हवी. आताच कोरोना रुग्णसंख्या ६४ हजारापर्यंत पाेहोचली आहे. मृत्यूची संख्या ही १८०० पार झाली आहे. सध्या कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळायची गरज आहे. तेवढीच गरज आता शासनाने कोरोना प्रतिबंधक लस नागरिकांना मिळण्यासाठी आग्रही राहण्याची. अधिकाधिक नागरिकांना लसीकरण होण्यासाठी पुरेशा लसीचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याची.
कोरोनाची दुसरी लाट जीवघेणी ठरली आहे. रुग्णसंख्येचा विस्फोट होतानाच कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही तेवढीच लक्षणीय आहे. या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यातच आता डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटने देशाची चिंता वाढवली आहे. सद्य परिस्थितीत कोरोनाच्या नियमांचे नागरिकांनी पालन करणे हा एक प्रभावी मार्ग आहे. त्याचबरोबर कोरोनापासून सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आणि विशेष म्हणजे मृत्यूच्या संख्येत घट होण्याच्या दृष्टीने त्यावर लसीकरण हा प्रभावी उपाय असल्याचे यापूर्वीच जागतिक स्तरावरील आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळेचे कोरोनाच्या लाटेला थोपविण्यासाठी पाश्चात्त्य देशांनी संपूर्ण लसीकरण करून घेतले आहे. मात्र, त्या तुलनेने देशात उपलब्ध असलेल्या लसचा पुरवठा अपुरा असला तरीही जिल्हास्तरावर मिळणाऱ्या लसचे नियोजन योग्य प्रकारे व्हायला हवे.
सध्या जिल्ह्यात येणारा लसचा साठा नागरिकांच्या संख्येने अपुराच आहे. जिल्ह्यात १८ वर्षावरील लोकांची संख्या १३ लाख १५ हजार एवढी आहे. आरोग्य विभाग जेवढा साठा येईल तेवढा तो एकाच दिवसांत लसीकरण करून संपवीत आहे. मात्र, काही ठिकाणी लस वाया जाण्याचे प्रकारही घडत आहेत. जिल्ह्यात कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्यांची संख्या अघिक आहे. त्यातुलनेने कोव्हॅक्सिन घेणारे कमी आहेत. सध्या कोव्हॅक्सिन लसचे डोस अधिक प्रमाणात येत आहेत. त्यामुळे ते काही तालुक्यांमध्ये गरज नसतानाही अधिक पाठवले जात आहेत. मात्र, कोविशिल्डची गरज अधिक आहे, मात्र त्याचाच तुटवडा जाणवत आहे. काही ठिकाणी ही लसही अधिक प्रमाणात पाठविली जात आहे. त्यातही ज्यांचा पहिला डोस घेऊन अधिक कालावधी उलटला आहे, अशांना अजूनही लस मिळालेली नाही.
खरेतर सध्या अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे असल्याने आरोग्य विभागाने त्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. सध्या जिल्ह्यात केवळ ३० टक्केच लसीकरण झाले आहे. असे असताना तिसऱ्या लाटेचा सामना कसा करणार?