कोकणातील सागरी महामार्गाबाबत नितीन गडकरी उत्साही नाहीत?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 01:15 PM2023-04-01T13:15:39+5:302023-04-01T13:16:09+5:30
मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाला अपेक्षेपेक्षा खूपच वेळ लागला
रत्नागिरी : नवी आव्हानात्मक कामे हाती घेऊन ती वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी कोकणातील सागरी महामार्गाबाबत मात्र फारशी उत्सुकता दाखवलेली नाही. आधी सध्याचे (मुंबई- गोवा महामार्गाचे) काम होऊद्या, मग बघू, असे मोघम उत्तरच त्यांनी दिले.
गुरुवारी रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या मंत्री गडकरी यांनी प्रसारमाध्यमांशी मोकळेपणाने गप्पा मारल्या. सागरी महामार्ग आणि राजकीय विषयांबाबत मात्र त्यांनी फारसे स्वारस्य दाखवले नाही. याआधी मुंबई- गोवा महामार्गावरील पुलांच्या कामांचा प्रारंभ करण्यासाठी ते रत्नागिरीत आले होते, तेव्हा सागरी महामार्गही केंद्र सरकार करेल, असे म्हटले होते. मात्र, यावेळी त्यांनी या महामार्गाबाबत फारशी उत्सुकता दाखवली नाही. राज्य सरकार आता हा महामार्ग करत आहे. सध्याचे काम संपल्यावर त्याकडे बघू, एवढेच त्यांनी सांगितले.
मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाला अपेक्षेपेक्षा खूपच वेळ लागला आहे. कामे वेळेत पूर्ण करण्याची ख्याती असलेल्या गडकरी यांनी या कामाला झालेल्या विलंबाबाबत दु:खही व्यक्त केले. भूसंपादनात येणाऱ्या अडचणी, न्यायालयीन दावे यामुळे या कामाला विलंब झाला. कदाचित हीच बाब सागरी महामार्गाच्या उर्वरित कामाबाबतही होऊ शकते, अशा शक्यतेने त्यांनी यामध्ये स्वारस्य दाखवले नसावे, अशी चर्चा सध्या अधिकारी वर्गामध्ये सुरू आहे.
सद्य:स्थितीत रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गाची जबाबदारी राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सोपवली आहे. हा एकूण मार्ग ४९८ किलोमीटरचा असून, त्यासाठी अजून सुमारे ९,५०० कोटी खर्च अपेक्षित आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात या महामार्गाचा उल्लेख असला तरी आर्थिक तरतुदीचा उल्लेख मात्र करण्यात आला नव्हता.
थोडे चौपदरीकरण
सागरी महामार्गावर १६५ कि.मी. रस्त्याचे चौपदरीकरण मंजूर आहे. त्यात रत्नागिरी ते पावस या २० कि.मी. रस्त्याचा, रायगडमधील ८०, तर सिंधुदुर्गातील ६५ कि.मी. रस्त्याचा यात समावेश आहे.
अनेक पूल बाकी
सागरी महामार्गाचे बरेचसे काम पूर्ण झाले. मात्र, या मार्गावर अनेक ठिकाणी खाड्या असल्याने तेथील पुलांचे काम मात्र रखडलेलेच आहे. त्यामुळे हा महामार्ग आतापर्यंत पूर्ण होऊ शकला नाही.