HSC 12th Result 2022: बारावी परीक्षेत रत्नागिरी राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, यंदाही मुलींचा वरचष्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 07:00 PM2022-06-08T19:00:49+5:302022-06-08T19:01:28+5:30
जिल्ह्यात शाखानिहाय निकालात व्यवसायिक शाखेचा निकाल सर्वाधिक ९८.७० टक्के लागला.
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च - एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक (बारावी) प्रमाणपत्र परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्याने राज्यात दि्वतीय क्रमांक पटकावला असून जिल्ह्याचा निकाल ९६.३९ टक्के लागला आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा १.८१ टक्क्यांनी अधिक आहे. पुनर्परीक्षार्थींचा निकाल ५७.६६ टक्के इतका लागला आहे.
बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील १५४ कनिष्ठ महाविद्यालयांमधील १९,१८३ मुलांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी १९०९१ मुले परीक्षेला बसली. यापैकी मुले ९६५७, तर मुली ९४३४ होत्या. या परीक्षेसाठी मुख्य केंद्रे ३७ आणि १४८ उपकेंद्रे होती. यातून १८,४०२ मुले (९६.३९ टक्के) उत्तीर्ण झाली आहेत. यात मुलांची संख्या ९,२२२, तर मुलींची संख्या ९,१८० इतकी आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.४९ टक्के, तर मुलींचे ९७.३० टक्के इतके आहे. मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा १.८१ टक्क्यांनी अधिक आहे. तसेच ३०० पुनर्परीक्षार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १७३ (५७.६६ टक्के) उत्तीर्ण झाले.
जिल्ह्यात शाखानिहाय निकालात व्यवसायिक शाखेचा निकाल सर्वाधिक ९८.७० टक्के लागला. त्याखालोखाल विज्ञान शाखेचा ९८.५२, वाणिज्यचा ९६.६१, कला शाखेचा ९३.१७ आणि टेक्निकल सायन्सचा ४६.१५ टक्के निकाल लागला.
या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक त्यांच्या उच्च माध्यमिक शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शुक्रवार, दि. १७ रोजी दुपारी ३ वाजता वितरित करण्यात येणार आहे. त्याबाबतचे परिपत्रक़ स्वतंत्रपणे मंडळाकडून काढले जाणार आहे. पुरवणी परीक्षेसाठीही पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार, दि. १० जूनपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येणार आहेत.
गुणपत्रिकेच्या पडताळणीसाठी १० ते २० जून या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे, तर छायाप्रतीसाठी १० ते २९ जून या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घ्यावी लागणार आहे. सर्व विषय घेऊन बसलेल्या व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी-गुण सुधार योजनेअंतर्गत उपलब्ध होतील, असे कोकण विभागीय मंडळाने कळविले आहे.