रखडलेल्या चौपदरीकरणाविरोधात चिपळुणात उद्या मानवी साखळी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:21 AM2021-07-08T04:21:53+5:302021-07-08T04:21:53+5:30
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत मुंबई-गोवा महामार्ग समन्वय समितीने थेट आंदोलनाची भूमिका घेतली आहे. चिपळूण बहादूरशेख नाका येथे ...
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत मुंबई-गोवा महामार्ग समन्वय समितीने थेट आंदोलनाची भूमिका घेतली आहे. चिपळूण बहादूरशेख नाका येथे ९ रोजी महामार्गावर मानवी साखळी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. समन्वय समितीचे अध्यक्ष संजय यादवराव व उच्च न्यायालयाचे वकील ओवेस पेचकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण गेले कित्येक वर्षे रखडले आहे. आता प्रत्यक्षात काम सुरू असले तरी कामाची गती प्रचंड मंदावली आहे. काही ठिकाणी अद्याप कामाला सुरुवातदेखील झालेली नाही. अनेक महत्त्वाच्या पुलांची कामे अर्धवट आहेत. तर संगमेश्वर येथील सोनवी पुलाच्या कामाला आद्यप प्रारंभदेखील झालेला नाही. चौपदरीकरणात बाधित होणाऱ्या लोकांच्या अनेक समस्या असून, त्याकडेही लक्ष दिले जात नाही. काहींना अद्यापही नुकसानभरपाई मिळालेली नाही.
अशा पद्धतीने जर काम सुरू राहिले, तर पुढील १० वर्षे तरी महामार्गाचे काम पूर्ण होणार नाही. अपघात होऊन निष्पाप लोकांचे बळी जात राहतील. याची दखल घेत मुंबई-गोवा महामार्ग समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्या माध्यमातून आता जनतेचा आवाज थेट शसनापर्यंत पोहोचवण्याची तयारी करण्यात आली आहे. या महामार्गाबाबत जर शासनाला जाग आणायची असेल तर जनआंदोलन हाच पर्याय असल्याचे स्पष्ट करत समन्वय समितीने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. याबाबत नुकतीच समन्वय समितीची बैठक संजय यादवराव यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी ॲड. ओवेस पेचकर, मुस्लिम विकास मंच अध्यक्ष अनवर पेचकर, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु अर्ते, प्रमोद हर्डीकर, मझहर पेचकर, सदृद्दीन पटेल उपस्थित होते.