ह्युम्युनिटी कमिटी, खैर ए उम्मत कमिटीने केली रुग्णांच्या नातेवाइकांसाठी सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:33 AM2021-04-28T04:33:39+5:302021-04-28T04:33:39+5:30
रत्नागिरी : जिल्हा महिला रुग्णालयात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरात त्यांच्या नातेवाइकांचीही गर्दी वाढू लागली आहे. ...
रत्नागिरी : जिल्हा महिला रुग्णालयात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरात त्यांच्या नातेवाइकांचीही गर्दी वाढू लागली आहे. मात्र, या रुग्णांच्या नातेवाइकांची गैरसोय होत असल्याने येथील ह्युम्युनिटी कमिटी आणि मिरकरवाडा येथील खैर ए उम्मत कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी महिला रुग्णालयासमोर रुग्णांच्या नातेवाइकांसाठी बसण्यासाठी तात्पुरती सोय केली असून, स्वच्छता सुविधांसह लाईट, पंखे, आदी सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवारी या रुग्णालयाला भेट दिली असता या दोन्ही कमिटी सदस्यांच्या कार्याबद्दल गौरव केला.
महिला रुग्णालयात रुग्ण संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे त्यांच्या काळजीने त्यांचे नातेवाईकही या परिसरात वावरत असतात. मात्र, या बहुसंख्येने असलेल्या नातेवाइकांची सोय करणे प्रशासनाला शक्य नाही. मात्र, या रुग्णांच्या नातेवाइकांची अडचण लक्षात घेऊन येथील ह्युम्युनिटी कमिटी आणि खैरे ए उम्मत कमिटीच्या तरुणांनी रमजान महिन्यातील पवित्र रोजांचे पालन करतानाच महिला रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी बसण्यासह अन्य सुविधा उभारून दिल्या आहेत.
त्यांच्या या सामाजिक कार्याचे कौतुक करताना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या दोन्ही कमिटीचे काम इतरांना प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढले. इतर सामाजिक संस्थांनीही अशा कामात पुढे आले पाहिजे, असे आवाहन केले. शिरगाव ग्रामपंचायतीने केलेल्या स्वच्छतेची आणि बसविण्यात आलेल्या बायो टॉयलेटची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली व ग्राम विकास अधिकारी वासुदेव सावके यांचेही कौतुक केले. त्यांच्यासमवेत जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमिश्रा फुले तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी शकील मुर्तुझा, रहिम अकबर अली, नगरसेवक मुसा काजी, पत्रकार अलिमियां काझी, साहिल पठाण, ईलू खोपेकर, शकील मोडक, सिकंदर खान, इस्माईल नाकाडे, सहजाद ईब्जी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, मिरकरवाडा येथे तातडीने मोहल्ला क्लिनिक सुरू करण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिले. सामाजिक कार्य करणाऱ्या सर्वांना ओळखपत्रही दिले जातील, असे सांगितले. कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना धन्यवाद देतानाच यापुढेही आपण जोमाने काम करू, असे सांगितले.