नेत्यांच्या साठमारीत गरिबांची उपासमारी

By admin | Published: July 31, 2016 12:36 AM2016-07-31T00:36:05+5:302016-07-31T00:36:05+5:30

वारकरी, साईभक्तांच्या खांद्यावर बंदूक : चिपळुणात राजकीय नाट्यावर पडदा, पण...

The hunger of the poor in the harvesting of leaders | नेत्यांच्या साठमारीत गरिबांची उपासमारी

नेत्यांच्या साठमारीत गरिबांची उपासमारी

Next

चिपळूण : तालुक्यातील कोंढे गावी बांधकाम खात्याची परवानगी न घेताच शाखा अभियंत्याकडून लाईनआऊट घेऊन उभारलेला भगवा ध्वज प्रशासनाने गुरुवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एसआरपीच्या कडक बंदोबस्तात हटवला. यामुळे गेले १२ दिवस रंगलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला. या नाट्यात अग्रभागी असलेल्या शिवसेनेला केंद्रात व राज्यात अगदी जिल्हा परिषदेतही सत्ता असूनही बॅकफूटवर जावे लागले. आता सेनेने वारकरी, साईभक्त व नागरिकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निषेधाचा चाप ओढला आहे.
कोंढे येथील चौकाचे सुशोभिकरण व्हावे, असे पत्र ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात आले होते. या पत्रावर निर्णय होण्यापूर्वीच बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी तोंडी परवानगी देऊन एका शाखा अभियंत्याने लाईनआऊटही काढून दिले. त्यानुसार खाडीपट्ट्यातील सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व साईभक्त, वारकरी यांनी मिळून सिमेंटचा गोल चौक उभारुन त्यावर भगवा झेंडा उभारला. आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम गोलमडे, जिल्हाप्रमुख सचिन कदम, सरपंच शशिकांत साळवी आदी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दि. १७ जुलै रोजी त्याचे उद्घाटन झाले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याला हरकत घेतली. याबाबतचा वाद चिघळू नये, यासाठी पोलीस प्रशासन व बांधकाम विभागाने बैठका घेऊन कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आमदार सदानंद चव्हाण यांनीही याबाबत बैठक घेतली व बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी योग्य कार्यवाही करावी, असे सुचविले. दरम्यान, पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने हे प्रकरण अतिशय संयमाने हाताळले. वेळोवेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी, स्थानिक सरपंच व पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली.
बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत आपण झेंडा हलविणार असाल तर परिसरातील अनधिकृत बांधकामे व टपऱ्याही हटवाव्यात, असे निवेदन शिवसेना व स्थानिक ग्रामस्थांतर्फे देण्यात आले होते. बांधकाम खात्याने परवानगीसाठी आलेल्या अर्जावर निर्णय घेतलेला नसताना त्यांच्याच अधिकाऱ्याने केलेल्या चुकीमुळे हा स्तंभ उभा राहिला व त्यातून नाहक राजकारण तापू लागले. झेंडा हलवावा तरी विरोध आणि न हलवावा तरीही विरोध यामध्ये बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचे यात सॅण्डविच झाले. त्यातून १४ अनधिकृत टपरीवाले व खोकेधारकांना बांधकाम हटविण्याच्या नोटीस देण्यात आल्या. त्यामुळे वर्षानुवर्ष हातावर पोट असणाऱ्या येथील गरिबांच्या पोटावर पाय येतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली. यावेळी गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे खोकेधारकांच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे या प्रकरणाला अधिकच राजकीय रंग आला. यामुळे दोन पक्षांमधील हा वाद असल्याचे चित्र हळूहळू रंगू लागले. दरम्यानच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांनी हा भगवा झेंडा हटविण्याचे पत्र बांधकाम खात्याला दिले आणि रात्रीभर पावसात तहसीलदार जीवन देसाई, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, बांधकाम विभागाचे अभियंता धामापूरकर यांच्या उपस्थितीत हा झेंडा येथून हलविण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दंगाविरोधी पथकाचे शेकडो जवान तैनात ठेवण्यात आले होते. घटनास्थळी चोख पोलीस बंदोबस्त होता तर बांधकाम खात्याच्या कार्यालयातही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
रस्त्याच्या मध्यभागी चौकाच्या नावाखाली उभारण्यात आलेल्या या स्तंभामुळे खरोखरंच वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता ही वस्तुस्थिती आहे. हा झेंडा हटविल्यानंतर शिवसेनेतर्फे साईभक्त, वारकरी व सर्वपक्षीय नागरिकांचा आधार घेत ही कृती निषेधार्ह असल्याचे सांगण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका करण्यात आली. मालदोली गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो यापुढेही अबाधित राहिल, असे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी सांगितले. मात्र, या प्रकरणी शिवसेना बॅकफूटवर गेल्याचे पत्रकारांनी जिल्हाप्रमुखांच्या निदर्शनास आणून दिले असता, शिवसेना अग्रभागी असली तरी साईभक्त, वारकरी व सर्वपक्षीय नागरिकांनी हा स्तंभ उभारला असल्याचे सांगितले. एकूणच ही सारवासारव सर्वसामान्यांच्या लक्षात आली आहे. हा झेंडा पुन्हा उभारला जाईल, असे जिल्हाप्रमुखांनी सांगितले असले तरी आज ‘बुंद से गयी वो हौद से नही आती’ अशी सेनेची स्थिती झाली आहे. केंद्रात, राज्यात व जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. ज्या भागात ही घटना घडली तो भाग शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. असे असताना भगवा झेंडा खाली उतरण्याची नामुष्की यावी, हे दुर्दैव आहे. हा प्रयत्न असफल ठरला असला तरी आगामी निवडणुकीत वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे काही शिवसैनिकांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 

Web Title: The hunger of the poor in the harvesting of leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.