चक्रीवादळाने नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:33 AM2021-05-18T04:33:21+5:302021-05-18T04:33:21+5:30
देवरूख : संगमेश्वर तालुक्यात तौक्ते वादळाने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. तालुक्यातील निवे खुर्द परिसरालाही या चक्रीवादळाचा चांगलाच ...
देवरूख : संगमेश्वर तालुक्यात तौक्ते वादळाने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. तालुक्यातील निवे खुर्द परिसरालाही या चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसला. झाडे पडल्याने मुख्य मार्ग बंद झाला होता. मात्र तो मोकळा करण्यात आला. शनिवारी दुपारपासून पावसाने थैमान घातले होते.
आरोग्य केंद्राला मदत
सावर्डे : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गरजा लक्षात घेऊन प्राथमिक शिक्षक संघ चिपळूण शाखेतर्फे या केंद्राला विविध स्वरूपात मदत करण्यात आली. या रुग्णालयात ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे ऑक्सिमीटर, हॅण्डग्लोव्हज, मास्क, सॅनिटायझर आदी साहित्य देण्यात आले.
रक्तदान शिबिर
चिपळूण : तालुक्यातील मेमन समाज युवकांच्या यंग बॉइज संघटनेतर्फे १९ रोजी महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. येथील अपरांत रुग्णालयात सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत हे रक्तदान शिबिर होणार आहे. महिलांसाठी स्वतंत्र कक्षाची उभारणी करण्यात आली आहे.
चक्रीवादळाचा फटका
साखरपा : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाला तौक्ते चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसला. नाणीज, करंजारी, देवळे, दाभोळे या ठिकाणी महामार्गावर मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले होते. ही झाडे बाजूला करण्याचे काम कर्मचाऱ्यांबरोबर स्थानिकांना करावे लागले. सुमारे तासभर हा महामार्ग बंद होता.
विजयानंद शेट्ये प्रथम
देवरूख : वरदान क्रीडा मंडळ, कडवई आयोजित तालुकास्तरीय मोबाइल फोटोग्राफी स्पर्धेत विजयानंद शेट्ये याने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत ५४ जणांनी सहभाग घेतला होता. द्वितीय क्रमांक तेजस कोल्लम पिरंबत द्वितीय आणि योगीराज खातू यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
रुग्णालयात वस्तूंचे वाटप
दापोली : उपजिल्हा रुग्णालय येथील निवासी शेडमध्ये असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी आदर्श मित्रमंडळ, दापोली यांच्या सौजन्याने फॅन आणि मच्छर अगरबत्ती आदी वस्तूंची सोय उपलब्ध करून देण्यात आली. मंडळाचे उपाध्यक्ष तेजस जाधव, सेक्रेटरी धीरज राजपूरकर, सदस्य मंगेश राजपूरकर, ओेंकार दुर्गवळे आदी उपस्थित होते.
जीवनावश्यक वस्तू
चिपळूण : तालुक्यातील चिवेली येथील साळुंखे परिवारातर्फे गावातील ३५० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप येत्या दोन दिवसात करण्यात येणार आहे. मुंबईतील सामाजिक संस्था, दीपजन सेवा आणि साळुंखे परिवार यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. १२ वाड्यांमधील कुटुंबांना हे वाटप होणार आहे.
पेट्रोल, डिझेल दरवाढ
रत्नागिरी : कोरोना काळातही वाहतुकीवर काही प्रमाणावर निर्बंध आले आहेत. तरीही पेट्रोल, डिझेल दरवाढ सातत्याने होत आहे. काहीवेळा इंधनाचे दर कमी होतात मात्र पुन्हा ते त्याहीपेक्षा अधिक वाढविले जातात. त्यामुळे या दरवाढीने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
ग्रामीण भागात नुकसान
पाली : कोकण किनारपट्टीवर झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. ग्रामीण भागात मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले. या भागातील आंबा, काजू बागायतदारांना या वादळाचा अधिक फटका बसला. लाखो रुपयांचे नुकसान झाले.
खाडीपट्ट्याला फटका
रत्नागिरी : जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यातील खाडीपट्टा भागाला चांगलाच दणका दिला. मुसळधार पावसाने तसेच गडगडाटाने परिसरातील वीजपुरवठा १२ तासांहून अधिक काळ खंडित झाला होता. शनिवारी दुपारपासूनच या भागाला वादळी पावसाचा त्रास होत होता.