तौक्ते चक्रीवादळाने साडेदहा लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:33 AM2021-05-20T04:33:57+5:302021-05-20T04:33:57+5:30
चिपळूण : तौक्ते चक्रीवादळाने तालुक्यातील ६८ गावांना जोरदार तडाखा बसला. वादळवाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसात तालुक्यातील २३ सार्वजनिक मालमत्तांसह १६० ...
चिपळूण : तौक्ते चक्रीवादळाने तालुक्यातील ६८ गावांना जोरदार तडाखा बसला. वादळवाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसात तालुक्यातील २३ सार्वजनिक मालमत्तांसह १६० घरे, गोठे, दुकाने व टपरीची पडझड झाली. यामध्ये १० लाख ४१ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी दिली. तर ठिकठिकाणी महावितरणचे विद्युत खांब कोसळल्याने तीन गावे अजूनही अंधारात आहेत.
तौक्ते चक्रीवादळाने रविवारी तालुक्यात हाहाकार उडविला. दोन दिवस वादळ-वाऱ्यासह पावसाचे वातावरण होते. या वादळामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मालमत्तांचे मोठे नुकसान झाले. प्रांताधिकारी प्रवीण पवार व तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी महसूलसह कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार सोमवारपासूनच पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.
या वादळात ४८ पक्क्या घरांचे एकूण २ लाख ८८ हजार रुपयांचे अंशत : नुकसान झाले, तर ८५ कच्च्या घरांना तडाखा बसून, त्यात ४ लाख २५ हजार रुपयांचे अंशतः नुकसान झाले आहे. तसेच ४ गोठ्यांचे ३६ हजारांचे अंशत: नुकसान झाले आहे. तब्बल २३ सार्वजनिक मालमत्तांचे या वादळामुळे २ लाख ९२ हजारांचे अंशतः नुकसान झाले आहे. असे एकूण १६० मालमत्तांचे १० लाख ४१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
ठिकठिकाणी वीज खांबांवर झाडे व झाडाच्या फांद्या पडून घरांचे व विद्युत खांब जमीनदोस्त होऊन महावितरणचेही मोठे नुकसान झाले आहे. ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी रविवारी रात्रीपासूनच महावितरणची यंत्रणा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या कामाला लागली होती. रात्र, उन्हाची तमा न बागळता या वीज कर्मचाऱ्यांनी सेवा बजावून शहरासह विविध भागातील विद्युत पुरवठा सुरळीत केला आहे. केवळ तालुक्यातील तीन गावांमध्ये अद्याप वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही.