राजापुरात घरावर झाड पडून पती-पत्नी जखमी, मुले बालंबाल बचावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:37 AM2021-07-14T04:37:04+5:302021-07-14T04:37:04+5:30
राजापूर : मुसळधार पावसामुळे शहरानजीकच्या शीळ येथील जयकुमार बिर्जे आणि विश्वास बिर्जे यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळल्याची घटना रात्री ...
राजापूर : मुसळधार पावसामुळे शहरानजीकच्या शीळ येथील जयकुमार बिर्जे आणि विश्वास बिर्जे यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळल्याची घटना रात्री १ वाजण्याच्यादरम्यान घडली. घराच्या ज्या ठिकाणी झाड पडले, त्या खोलीमध्ये विश्वास बिर्जे, त्यांची पत्नी आणि दोन मुले झोपलेली होती. या घटनेमध्ये सुदैवाने झोपलेल्या लहान मुलांना कोणतीही इजा झालेली नाही. मात्र, विश्वास आणि त्यांची पत्नी किरकोळ जखमी झाली आहेत.
रात्रीचे जेवण उरकून विश्वास बिर्जे, त्याची पत्नी नीलम दोन छोट्या मुलांसह घराच्या पाठीमागील पडवीतील खोलीमध्ये झोपली होती. गाढ झोपेमध्ये असताना रात्री अचानक अंगावर मोठे काहीतरी पडल्याची त्यांना जाणीव झाली. अचानक घडलेल्या या घटनेने घाबरलेले पती-पत्नी तात्काळ जागी होऊन त्यांनी खोलीतील लाईट सुरू केला. खोलीमध्ये छप्परावरील तुटलले पत्रे पाहून स्वतः जखमी झालेल्या स्थितीमध्ये छोट्या मुलांना घेऊन खोलीतून बाहेर पडले.
दरम्यान, ही माहिती शीळचे उपसरपंच अशोक पेडणेकर आणि सहकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी किरकोळ जखमी झालेल्या विश्वास बिर्जे व त्यांच्या पत्नीला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्या दाेघांचीही प्रकृती व्यवस्थित असल्याचे उपसपरपंच पेडणेकर यांनी दिली. दरम्यान, साेमवारी सकाळी पडवीच्या छपरावर पडलेले आंब्याचे झाड बाजूला करून पडवी मोकळी करण्याचे काम करण्यात आले. सरपंच नामदेव गोंडाळ, तलाठी कोकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी आणि पंचनामा केला. आंब्याचे झाड पडून नुकसान झालेली पडवी सुस्थितीमध्ये होईपर्यंत बाजूच्या घरामध्ये बिर्जे कुटुंबियांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती उपसरपंच पेडणेकर यांनी दिली.