परुळे येथे पतीनेच केला पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:21 AM2021-06-27T04:21:19+5:302021-06-27T04:21:19+5:30

राजापूर : कोणीतरी विचित्र चेहऱ्याच्या व्यक्तीने आपल्या पत्नीला उचलून जंगलात नेले, असा बनाव ग्रामस्थांसमोर रचणाऱ्या एका प्रौढाचे पितळ पोलिसांनी ...

Husband killed his wife at Parule | परुळे येथे पतीनेच केला पत्नीचा खून

परुळे येथे पतीनेच केला पत्नीचा खून

Next

राजापूर : कोणीतरी विचित्र चेहऱ्याच्या व्यक्तीने आपल्या पत्नीला उचलून जंगलात नेले, असा बनाव ग्रामस्थांसमोर रचणाऱ्या एका प्रौढाचे पितळ पोलिसांनी काही तासातच उघड केले आहे. शिवीगाळ करणे, त्रास देणे या कारणास्तव आपणच पत्नीचे नाक व तोंड दाबून खून केल्याची कबुली त्याने दिली आहे. ही घटना राजापूर तालुक्यातील परुळे येथे शुक्रवारी घडली. सिध्दी उर्फ विद्या गजानन भोवड (३५) असे तिचे नाव असून, तिचा पती गजानन जगन्नाथ भोवड (४०) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजापूर तालुक्यातील परुळे येथील सुतारवाडीत भोवड कुटुंबीय सामायिक घरात राहते. एका भागात गजानन, दुसऱ्या भागात त्याचे आई-वडील व भाऊ आणि तिसऱ्या भागात त्याच्या चुलतीचे कुटुंब राहते. गजानन, त्याची पत्नी सिध्दी व आठ वर्षीय मुलगा हे तिघेजण कळवा (ठाणे) येथे राहात होते. तो परळ येथे एका प्रिंटींग प्रेसमध्ये लॅमिनेशन ऑपरेटर म्हणून कामाला होता. एप्रिलमधील लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने नंतर तो पत्नी व मुलासह दिनांक २९/५/२०२१ला आपल्या परुळे गावी आला. त्यानंतर ते सगळे गावीच होते.

मयत सिध्दी उर्फ विद्या हिची बहीण परुळे येथे राहत असून, तिला बघण्यासाठी शुक्रवारी दुपारी गजानन व सिद्धी निघाले. जंगलातून जात असताना गजाननने अचानक सिध्दीचे नाक व तोंड दाबून धरले. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला होता. सिद्धी मृत झाल्याचे लक्षात येताच गजानन घरी आला व आजुबाजूच्या मंडळींशी बोलताना त्याने कथाच रचून सांगितली. आपण सिद्धीसमवेत जात असताना समोरुन एक पांढऱ्या चेहऱ्याची राकट व विचित्र दिसणारी एक व्यक्ती आली. त्या व्यक्तीने आपल्याला ढकलून दिले व पत्नीला उचलून तो जंगलात निघून गेला. तेव्हा आपली शुध्द हरपली होती. मात्र, त्यातून सावरल्यावर आपण घरी आलो, अशी कथा त्याने ग्रामस्थांना सांगितली. त्यानंतर तेथे उपस्थित असलेले अनेक ग्रामस्थ विद्याचा शोध घेत जंगलाच्या दिशेने निघाले. परुळे तट अशी त्या परिसराची ओळख असून, तेथे शोध घेताना सिध्दी मृतावस्थेत आढळली. त्या घटनेची खबर परुळे गावचे पोलीस पाटील विलास कस्पले यांना देण्यात आली. मात्र, ते गृह अलगीकरणात असल्याने त्यांनी रायपाटण पोलिसांना झाल्या प्रकाराची माहिती दिली.

गजाननने पोलिसांनाही अज्ञात व्यक्तीने आपल्या पत्नीला ओढत नेल्याची कथा सांगितली. तशी तक्रार त्याने पोलीस स्थानकात नोंदवली. लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीनिवास साळोखे, राजापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक जनार्दन परबकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मौळे, पोलीस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बसवंत, हेडकाँस्टेबल वाघाटे, आर. डी. तळेकर, महिला कर्मचारी नामये, आर. कात्रे कोळी, होमगार्ड शिंदे, प्रभुलकर, पोलीस वाहनचालक वाडकर, बाणे आदी घटनास्थळी दाखल झाले.

शुक्रवारी रात्री अकरा वाजल्यापासून पोलीस गजाननची कसून चौकशी करत होते. मात्र, तो पोलिसांना गुंगारा देत होता. अज्ञात व्यक्तीने पत्नीला ओढत नेले व नंतर तिचा मृत्यू झाला, असेच तो सांगत होता. पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नाचा भडीमार सुरुच ठेवला होता. यात पूर्णपणे फसलेल्या गजाननने अखेर शरणागती पत्करली आणि सिध्दीचा खून आपणच केल्याची कबुली दिली. सिध्दी आपल्याला शिवीगाळ करत होती, त्रास देत होती. त्यामुळे आपण तिचा खून केल्याची कबुली गजाननने दिली. भारतीय दंड विधान कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल करून गजाननला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास राजापूरचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर करत आहेत.

Web Title: Husband killed his wife at Parule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.