मी आता राष्ट्रवादीत सक्रिय : माजी आमदार रमेश कदम यांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 04:34 PM2019-09-26T16:34:43+5:302019-09-26T16:35:59+5:30
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावर बाजूला करण्यात आलेले चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी आता राष्ट्रवादीत सक्रिय होण्याची घोषणा केली आहे. पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम निवडणुकीनंतर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
चिपळूण : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावर बाजूला करण्यात आलेले चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी आता राष्ट्रवादीत सक्रिय होण्याची घोषणा केली आहे. पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम निवडणुकीनंतर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मूळचे काँग्रेस कार्यकर्ते असलेल्या रमेश कदम यांनी चिपळूणचे नगराध्यक्ष पद भुषवले आहे. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर रमेश कदम यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. २00४ साली ते राष्ट्रवादीकडून चिपळूणचे आमदार झाले. मात्र भास्कर जाधव यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर चिपळूणमध्ये जोरदार शीतयुद्ध सुरू झाले.
या वादाच्या पार्श्वभूमीवर २00९ मध्ये रमेश कदम यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर रायगड लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढवली. त्यात ते सुनील तटकरे यांच्याविरोधात उभे होते.
शेकापमध्ये ते फार काळ राहिले नाहीत. २00९च्या निवडणुकांनंतर ते मुख्य प्रवाहात नव्हते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र आठच महिन्यात त्यांनी भाजपला रामराम केला. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. तेथे त्यांना जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले.
मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांना अचानक या पदावरून बाजूला करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी काँग्रशसचे खासदार हुसेन दलवाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र आपण पुढे काय करणार, हे स्पष्ट केले नव्हते.
गुरूवारी कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन, आता आपण पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होत असल्याचे सांगितले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आपल्याला फोन केला होता. तुमच्यासारखी माणसे राष्ट्रवादी काँग्रेसला हवी आहेत, असे त्यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे यांच्याशीही आपली चर्चा झाली. आपण आता शेखर निकम यांच्या प्रचारात सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले.