तुमच्या लढाईत मी तुमच्या सोबत : नीलेश राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:29 AM2021-04-12T04:29:19+5:302021-04-12T04:29:19+5:30
लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार नीलेश राणे यांची भेट घेऊन चर्चा केली. (छाया : तन्मय दाते) लाेकमत ...
लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार नीलेश राणे यांची भेट घेऊन चर्चा केली. (छाया : तन्मय दाते)
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी: लॉकडाऊनच्या जाचक निर्बंधांमुळे त्रस्त झालेल्या रत्नागिरीतील व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने रविवारी भाजपचे प्रदेश सचिव व माजी खासदार नीलेश राणे यांची भेट घेतली. यावेळी आपण तुमच्यासोबत असल्याची ग्वाही नीलेश राणे यांनी व्यापाऱ्यांना दिली.
व्यापारी सध्या अनेक अडचणीतून जात आहे. त्यात राज्य शासनाने मिनी लॉकडाऊन जाहीर करून गोंधळाची स्थिती निर्माण केली. यामुळे व्यापाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याबाबत त्यांनी मंत्री, प्रशासन यांच्याकडे स्वतःची बाजू मांडली. परंतु या निर्बंधाला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगण्यात आले. तर व्यापारी महासंघाने लावलेले निषेधाचे फलकसुद्धा नगराध्यक्षांकडून हटविण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सरकारने कडक लॉकडाऊन जाहीर केला तर ठीक नाहीतर अर्धवट लॉकडाऊन जाहीर केल्यास त्याचा विरोध करा, भले केसेस झाल्या तरी चालतील, न्यायालयीन लढाईत माझे वकील देऊन मी तुमच्यामागे खंबीरपणे उभा राहीन, असे वचन माजी खासदार नीलेश राणे यांनी व्यापारी शिष्टमंडळाला दिले. या भेटीच्या वेळी व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष उदय पेठे, तालुकाध्यक्ष निखिल देसाई, शहर अध्यक्ष गणेश भिंगार्डे, उपाध्यक्ष राजकुमार जैन, किशोर मोरे, अमोल डोंगरे, नीलेश जैन आदी पदाधिकारी उपस्थित होते.