उशाजवळ साप ठेवून मी झोपू शकत नाही: भास्कर जाधव, ठाकरे गटातील विरोधकांचा घेतला समाचार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 06:12 AM2024-03-11T06:12:41+5:302024-03-11T06:13:48+5:30
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी पक्षांतर्गत विरोधकांचा समाचार घेतला.
लाेकमत न्यूज नेटवर्क, चिपळूण : माझी लढाई वैयक्तिक नाही, तर पक्षासाठी आहे. परंतु, उशाजवळ साप ठेवून मी झाेपू शकत नाही. पक्षातीलच काही जण माझ्या विरोधात षडयंत्र रचत आहेत. स्वतः निष्ठेच्या गोष्टी सांगायच्या आणि पक्षात राहून पक्षाचीच वाट लावायची ही वृत्ती घातक आहे, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी पक्षांतर्गत विरोधकांचा समाचार घेतला.
आ. जाधव यांनी ‘या, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे’, असे पक्षातील पदाधिकाऱ्यांना आवाहन करत रविवारी स्नेहमेळावा आयोजित केला होता. माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेत अटक झालेल्या समर्थक कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. जाधव म्हणाले की, २०१९ मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी मंत्रिमंडळात मला संधी मिळायला हवी होती. तो माझा हक्क होता. पण संधी मिळाली नाही. पक्ष फुटीनंतर गटनेते निवडतानाही माझा विचार झाला नाही. पण, मी नाराज झालो नाही. कारण मी कोणताही स्वार्थ ठेवला नाही. पक्षातून आमदार फुटत होते, त्यावेळी काही आमदारांचा भाजपबरोबर जाण्याचा आग्रह होता. पण, मी एकट्याने थेट विरोध केला.
उद्धव ठाकरे यांना शब्द दिला आहे
२०२४ ला पुन्हा आपली सत्ता येत नाही तोपर्यंत मी तुमची साथ सोडणार नाही, हा शब्द मी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. त्यासाठी मी लढत आहे. लढत राहणार आहे, असे ते म्हणाले. योद्धा जेव्हा शरण जात नाही तेव्हा त्याला बदनाम केले जाते. हेच माझ्या बाबतीत घडत आहे. पण, मी कोणाला घाबरत नाही, असेही ते म्हणाले.
त्याला बाहेर काढा, याला घ्या ताब्यात...
चिपळुणात राडा झाल्यानंतर आमच्यातीलच काही लोक पोलिस स्थानकात फेऱ्या मारत होते. कार्यकर्त्यांच्या नावाची यादी देत होते. हा आमचा, तो भास्कर जाधवांचा, त्याला बाहेर काढा, याला घ्या ताब्यात, इतकेच नव्हे तर माझ्या सहकाऱ्यांचे पत्ते आणि घर पोलिसांना दाखवत होते. कोण हे गद्दार? हा माझा विश्वासघात आहे. अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण अद्याप मी बघितलेले नाही, असेही त्यांनी सांगितले.
मी घाबरणारा नसून लढणारा
चिपळुणातील राड्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटात अंतर्गत कलह सुरू झाला आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांवर आ. जाधव यांनी निशाणा साधला. स्थानिक पदाधिकाऱ्यानेच पाेलिसांना राड्यातील कार्यकर्त्यांची यादी दिल्याचा आराेपही त्यांनी केला. मात्र, मी घाबरणारा नसून लढणारा असल्याचे सांगत त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना लक्ष्य केले.