बेडवरून उठताही येत नाही... लवकरच घरी मिळणार लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:33 AM2021-07-28T04:33:40+5:302021-07-28T04:33:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : बेडवरून उठताही येत नाही, अशा रुग्णांना, दिव्यांगांना घरी जाऊन कोरोना लस देण्याची घोषणा राज्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : बेडवरून उठताही येत नाही, अशा रुग्णांना, दिव्यांगांना घरी जाऊन कोरोना लस देण्याची घोषणा राज्य सरकारने केली असली, तरीही सध्या लसचाच पुरवठा अपुरा आहे. त्यामुळे कोरोना लस घरी जाऊन देणार कशी, अशी पंचाईत आरोग्य विभागाची झाली आहे.
१६ जानेवारीपासून लस देण्यास सुरुवात झाली. आरोग्य क्षेत्रातील कोरोना योद्धे, तसेच पहिल्या फळीतील कर्मचारी यांना प्राधान्याने कोरोना लस देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर, आता १८ वर्षांवरील सर्वच व्यक्तींना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. बेडवर असलेले रुग्ण, चालू न शकणारे वृद्ध, दिव्यांग अशांच्या घरी जाऊन लस देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सध्या लसच अपुरी आहे, तर घरी जाऊन कशी देणार, अशी समस्या आरोग्य विभागासमोर उभी आहे.
मला लस कधी मिळणार?
मी दिव्यांग आहे. त्यामुळे मला लस घेण्यासाठी बाहेर पडता येत नाही, तसेच सरकारने ऑनलाइन नोंदणी करण्याचा नियम केला, तरी नोंदणी झाली असूनही लसीचे केंद्र मिळेनासे झाले आहे. त्यामुळे आमच्यासारख्यांना सरकारने घरी लस देण्याचा निर्णय घेतला असला, तरी ती आम्हाला मिळणार कधी?
- वामन शेळके, गुहागर
माझे वय ७२ वर्षे आहे. दोन वर्षांपूर्वी पायाचे ऑपरेशन झाल्याने मला चालता येत नाही. त्यामुळे मी अजूनही कोरोना लस घेऊ शकले नाही. आता शासनानेच आमच्यासारख्यांना घरी येऊन लस देण्याची सोय केली, तर लसीचा लाभ मिळेल, पण सध्या इतरांनाच लस मिळेनाशी झाली आहे. मग मला कशी मिळणार?
- शीला राठोड, रत्नागिरी.
हायरिस्कमध्ये काेण?
कोरोना रुग्णाच्या अनुषंगाने हायरिस्क असलेले घटक म्हणजे कोरोना रुग्णाच्या अगदी जवळच्या संपर्कातील व्यक्ती, म्हणजे त्याचे कुटुंबीय, तसेच त्याच्या संपर्कातील त्याचे नातेवाईक यांचा हायरिस्कमध्ये समावेश होतो. त्याचबरोबर, कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात येणारे त्याच्या कार्यालयातील त्याचे सहकारी अथवा त्याच्या कामाच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी असलेल्या व्यक्ती यांचाही समावेश होतो. त्याचबरोबर, कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यास ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, रक्तदाब, किडनीचा आजार, स्टेराॅइड थेरपी सुरू असलेल्या व्यक्ती, अन्य गंभीर आजार असलेल्या व्यक्ती अशांनाही काेरोनाचा धोका अधिक असल्याने, या व्यक्तींचाही हायरिस्कमध्ये समावेश होतो.
शासनाने ज्यांना चालता येत नाहीत, असे ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांग, बेडवर असलेल्या आजारी व्यक्ती अशांना घरी जाऊन कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु आता सगळीकडेच लसीचा पुरवठा अपुरा असल्याने अशा व्यक्तींना लस कशी देणार, लस असेल, तर लसीकरण दोन महिन्यांत आरोग्य यंत्रणा पूर्ण करेल.
- डाॅ.अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, रत्नागिरी.