तरीही माझी नाहक बदनामी, आरोप करणाऱ्यांना न्यायालयात खेचणार; 'या' प्रकरणावरुन भास्कर जाधवांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 01:25 PM2023-02-04T13:25:52+5:302023-02-04T13:26:12+5:30
कोकरे महाराज यांच्या मागील बोलविता धनी कोण?
चिपळूण : आपण स्वतः शेतकरी व गाई, म्हशींचे पालन करीत असल्याने गो शाळेला विरोध करणे माझ्या पिंडात नाही. सोनगावमधील गो शाळेचा मला कसलाही त्रास नाही. येथील गाे शाळेला माझा कधीच विराेध नव्हता. तरीही नाहक माझी बदनामी केली जात आहे. आरोप करणाऱ्यांना मी न्यायालयात खेचणार आहे, असा इशारा गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी शुक्रवारी (३ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले की, महामार्गावर सातत्याने गो हत्या होत होत्या, त्यात विशिष्ट समाजाचे लोक संशयित म्हणून सापडत होते. यातून जातीय दंगली घडू शकतात म्हणून संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी लक्षवेधी मी मांडली होती. भगवान कोकरे महाराज यांच्या गो शाळेचा लक्षवेधीमध्ये उल्लेखही केलेला नाही. त्यानंतर महामार्गावर होणाऱ्या गो हत्या बंद झाल्या. त्यामुळे कोकरे महाराज यांनी माझे अभिनंदन करायला हवे होते, पण तसे न करता ते माझ्या विरोधात सातत्याने आरोप करत आहेत.
सोनगावमधील गो शाळेला अनुदान मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केले. गो शाळेच्या विरोधात कारवाई करण्यासाठी मी कधीच कोणत्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला नाही. माझीही भूमिका मी पूर्वीही मांडली आहे. गणपती विसर्जनावेळी गावातील ग्रामस्थ आणि कोकरे महाराज यांचा वाद झाला. मला त्याची माहिती नव्हती. कारण त्यावेळी मी गावी होतो. कोकरे महाराज आणि स्थानिक ग्रामस्थांच्या वादात राजकीय स्वार्थापोटी मला ओढले जात आहे.
कोकरे महाराज यांच्या मागील बोलविता धनी कोण आहे, मला माहीत आहे. चाळीस वर्षांत मला घेरण्याचा प्रयत्न झाला त्यातही मी कधी कुणाला गावलो नाही. मी शिवसेनेत आलो म्हणून गो शाळेला विरोध करणारे लोक माझे कार्यकर्ते झाले. पण लोटे येथे दंगल झाली, तेव्हा हे कार्यकर्ते शिवसेनेत आणि मी राष्ट्रवादीत होतो. तेव्हा ते कार्यकर्ते रामदास कदम यांचे होते आणि तेव्हा माझी भूमिका लोकहिताची होती, असेही आमदार जाधव यांनी सांगितले.