माझा खर्च मीच केलाय! लंडन दौऱ्याचा मंत्री उदय सामंत यांनी दिला पुरावा
By मनोज मुळ्ये | Published: October 5, 2023 02:32 PM2023-10-05T14:32:57+5:302023-10-05T14:34:11+5:30
रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे महाराष्ट्रात परत आणण्याच्या कार्यक्रमासाठी लंडनला जाण्याचा खर्च माझा मीच केला होता, अशी ...
रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे महाराष्ट्रात परत आणण्याच्या कार्यक्रमासाठी लंडनला जाण्याचा खर्च माझा मीच केला होता, अशी चपराक राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना लगावली आहे. समाजमाध्यमावर त्यांनी याचे पुरावेही सादर केले आहेत.
महाराष्ट्रच नाही तर देशासाठी अभिमान वाटावा असा हा कार्यक्रम होता. त्यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत मंत्री उदय सामंत हेही लंडनला गेले होते. मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावरुन शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. त्या टीकेला मंत्री सामंत यांनी नाव न घेता उत्तर दिले आहे. त्याचेळी त्यांनी २०२२ च्या दावोस दौऱ्याबाबतची उत्तरे मिळाली नसल्याचा चिमटाही काढला आहे.
लंडन दौऱ्यासाठी जाण्यायेण्याचा तसेच तेथे राहण्याचा खर्च आपण स्वत: केला आहे. असे ट्विट मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. सोबत त्यांनी ट्रॅव्हल कंपनीला दिलेल्या धनादेशाची छायाप्रतही जोडली आहे. ‘२०२२ च्या दावोस दौऱ्याबाबत आपण केलेल्या प्रश्नांची उत्तरे अजून मिळालेली नाहीत. मी आता ती मागणारही नाही. जेव्हा केव्हा वेळ मिळेल, तेव्हा संबंधितांनी ती द्यावीत. माझ्यासाठी हा विषय संपला’, असे त्यांनी यात म्हटले आहे. त्याचवेळी महाराष्ट्र उद्योग जगतात पहिल्या क्रमांकावर असून, भविष्यातही हा क्रमांक कायम राहण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.