परगावातून येणाऱ्या प्रत्येकाची नाेंद ठेवणार : डाॅ. बी. एन. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:36 AM2021-09-06T04:36:06+5:302021-09-06T04:36:06+5:30
असगोली : गणेशोत्सवाच्या काळात परगावातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नाेंद ठेवण्यात येणार आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत त्रास होऊ नये. आनंदाने ...
असगोली : गणेशोत्सवाच्या काळात परगावातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नाेंद ठेवण्यात येणार आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत त्रास होऊ नये. आनंदाने गणेशोत्सव साजरा करावा. त्याचवेळी कोविड स्थिती नियंत्रणात ठेवता यावी, या बाबी प्रशासनाने डोळ्यासमोर ठेवून नियोजन केले आहे, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी पत्रकारांना दिली.
डॉ. पाटील दापोलीचा प्रशासकीय दौरा पार पडल्यानंतर गुहागरला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
गुहागर तालुक्यातील कोविड नियोजनाबाबत त्यांनी माहिती घेतली तसेच गणेशोत्सवाबाबत केलेले नियोजन, त्याची अमलबजावणी याचीही माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, परगावातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद आपण ठेवणार आहोत. एस. टी.द्वारे येणाऱ्या प्रवाशांची माहिती आगारातून तहसीलदार कार्यालयाकडे येईल. खासगी प्रवासी वाहनधारकांनी माहिती जिल्ह्यात प्रवेश करताना तपासणी नाक्यावर आर. टी. ओ. किंवा पोलिसांकडे दोन प्रतीत द्यायची आहे. या संदर्भातील अर्जाच्या नमुन्यांचे वितरण करुन झाले आहे. जे खासगी वाहनाने येतील, त्यांच्यासाठी ऑनलाईन गुगल फॉर्मची व्यवस्था केलेली आहे. हा अर्ज न भरल्यास तपासणी नाक्यावर भरुन द्यावा. ही माहिती ग्राम कृती दलाकडे हस्तांतरित केली जाईल.
ज्यांनी कोरोना चाचणी केलेली नाही, कोरोनाची लक्षणे आहेत, त्यांची चाचणी करुन घेणे, विलगीकरणात ठेवणे ही प्रक्रिया हे पथक करेल.
गणेशोत्सवादरम्यान आरत्या, भजन, जाखडी आदी सार्वजनिक कार्यक्रम करु नयेत. ओले पदार्थ प्रसाद म्हणून न देता सुका प्रसाद द्यावा. कोणीही प्लास्टिक कटलरी, पिशव्या, थर्माकोल आदी पर्यावरणाला घातक वस्तूंचा वापर करु नये. गणेशमूर्तीचे विसर्जन सार्वजनिक ठिकाणी न करता कृत्रिम हौदात करावे. निर्माल्य परसावात विसर्जन करावे किंवा गावपातळीवर निर्माल्य कलश तयार करुन निर्माल्य संकलित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डाॅ. पाटील यांनी केले.