‘मी विनाकारण बाहेर फिरणार नाही, मी घरातच राहणार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:29 AM2021-05-17T04:29:44+5:302021-05-17T04:29:44+5:30
देवरूख : गावातील ग्रामस्थांचे आरोग्य सुरक्षित व सुदृढ राहावे व कोविड -१९सारख्या विषाणूपासून त्यांचे संरक्षण व्हावे, या हेतूने चोरवणे ...
देवरूख : गावातील ग्रामस्थांचे आरोग्य सुरक्षित व सुदृढ राहावे व कोविड -१९सारख्या विषाणूपासून त्यांचे संरक्षण व्हावे, या हेतूने चोरवणे गावचे सरपंच दिनेश कांबळे यांनी जनजागृतीचा उपक्रम गावात राबविला आहे. उपसरपंच अनंत बसवणकर, ग्रामपंचायत सदस्य व वाडी, ग्रामकृती दलाच्या सहकार्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. ‘मी विनाकारण बाहेर फिरणार नाही, मी घरातच राहणार’ या संकल्पनेतून चोरवणे गावाने स्वयंघोषित कडकडीत बंद पाळला आहे.
गावात सॅनिटायझर फवारणी वेळोवेळी केली जात आहेत. वाडी-वस्तीत जनजागृतीपर फलक लावले आहेत. देवळे विभागातील मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, पोलीसपाटील, शिक्षक, अंगणवाडी सेविका, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व आशा सेविका यांच्या सहकार्यातून ग्रामकृती दलातील सदस्य वाडी-वस्तीत जावून लसीकरण मोहिमेसाठी जनजागृती करत आहेत.
गावात मुंबई, पुणेसारख्या अन्य जिल्ह्यांतून येणाऱ्यांनाही चांगल्याप्रकारची वागणूक देऊन त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरीच क्वारंटाईन केले जात आहे. अनेक नागरिक स्वत:हून कोरोनाची चाचणी करून घेत आहेत. व्यापारीही लॉकडाऊनला चांगले सहकार्य करत आहेत.
गाव सुरक्षित राहावा, या भूमिकेतून सरपंचांनी राबविलेल्या ‘माझा गाव, माझी जबाबदारी’ या मोहिमेला जनतेतून उत्तम प्रतिसाद मिळाला. शेजारील गावांमध्ये कोरोना वाढत असताना, चोरवणे गावाने कोरोनाला गावच्या सीमेवरच रोखले आहे. या विविध उपक्रमांसाठी ग्रामसेविका गौरी नेवरेकर, पोलीसपाटील दीपक जाधव, ग्रामकृती दल, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांचे सहकार्य मिळत आहे.
-------------------------
गावात येणाऱ्या-जाणाऱ्यांची नोंदणी
कोरोनाला गावाबाहेर ठेवण्यासाठी ग्रामपंचायत चोरवणे यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे. गावातून बाहेर जाणाऱ्या व गावात येणाऱ्या व्यक्तींची नोंद रजिस्टरमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गावातील लोक नोंद करूनच बाहेर जात आहेत.
फोटो: