चेतन बनलाय विद्यार्थ्यांसाठी आदर्श

By admin | Published: June 10, 2016 11:38 PM2016-06-10T23:38:55+5:302016-06-11T00:54:36+5:30

कथा त्याच्या जिद्दीची : अठराविश्व दारिद्र्याशी दोन हात

Ideal for cheated students | चेतन बनलाय विद्यार्थ्यांसाठी आदर्श

चेतन बनलाय विद्यार्थ्यांसाठी आदर्श

Next

रत्नागिरी : ‘वाळूचे कण रगडीता तेलही गळे’ या म्हणीप्रमाणे चेतनने घरातील अठराविश्व दारिद्र्याशी दोन हात करत दहावीप्रमाणेच बारावी परीक्षेतही उज्ज्वल यश संपादन केले. वयाच्या १०व्या वर्षी वडिलांचे निधन झाले. त्यातच अठराविश्व दारिद्र्य पाचवीला पुजलेले. अशा अत्यंत दुर्दम्य व हलाखीच्या परिस्थितीत चेतनने बारावीची परीक्षा ७० टक्क्यांनी उत्तीर्ण होत शाळेत चौथा क्रमांक पटकावला.
चेतनचे आई-वडील दोघेही मोलमजुरी करून घर चालवायचे. चेतन लहान असतानाच वडील गेले. वडिलांचे छत्र हरपले असतानाही त्याचा आधार बनली ती त्याची आई चंद्रकला घाटे आणि चेतनची आजी द्रौपदी पाष्टे! चेतनच्या वडिलांचा आधार गेल्यानंतर त्याची आई काही प्रमाणात खचली. पण खचून चालणार नव्हते. आपल्या मागे आपली दोन मुलं आहेत आणि त्याचं शिक्षण पूर्ण करून त्यांना स्वत:च्या पायावर उभं झालेलं तिला पहायचं होतं आणि म्हणूनच ही खचून गेलेली आई पुन्हा एकदा आपल्या मुलांसाठी एकट्याने संकटांचा सामना करण्यासाठी उभी राहिली. चेतनचे वडील गेल्यानंतर चेतनच्या आईने मोलमजुरी करत दोन्ही मुलांचे शिक्षण सुरुच ठेवले. मोलमजुरीचे काम करतानाच तिला पुढे जयगडमधील एका हॉटेलमध्ये काम मिळाले. यासाठी तिला सकाळी लवकर हॉटेलमध्ये जावे लागत असे. त्यामुळे घरातील कामे नेहमी हे दोन्ही भाऊ आपापसात वाटून घेत असत. अशा परिस्थितीतही चेतन आपले शिक्षण पूर्ण करत होता. चेतनचे सांडेलावगण हे गाव. तिथूनच ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या माध्यमिक विद्यामंदिर, जयगड या शाळेत त्याचे शिक्षण सुरु होते. आईचे पैसे वाचावे या जाणीवेतून चेतन रोज शाळेचे हे अंतर पायी पार करायचा आणि आईच्या कष्टांना उभारी द्यायचा.
चेतनने हीच जिद्द पुढेही टिकवून ठेवली आणि दहावीच्या परीक्षेत ७० टक्के गुण मिळवत पुढे बारावीला वाणिज्य शाखेचा अभ्यासही त्याने दिवसरात्र केला. चेतनचा बराचसा वेळ हा त्याच्या शाळेला पायी येण्या-जाण्यातच जात होता. त्याबरोबरच त्याला घरच्याही कामात लक्ष द्यावे लागायचे आणि म्हणूनच तो सकाळी लवकर उठून आणि रात्री काहीवेळ जागून आपला अभ्यास करत होता.
चेतन सांगतो की, मला स्वत:ला शिकून पुढे माझ्या भावालाही शिकवायचे आहे. आई आमच्यासाठी खूप कष्ट घेते. तिच्या कष्टातून निघणाऱ्या प्रत्येक थेंबाचे चीज मी करून दाखवेन. मला पुढे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून अधिकारी व्हायचंय आणि त्याचबरोबर मला माझ्या लहान भावालाही इंजिनिअर बनवायचंय. माझं हे स्वप्न आहे आणि त्यासाठी मी आईसोबत कष्ट घेण्याची तयारी ठेवली आहे. सध्या जिंंदाल कंपनीच्या आयटीआयमध्ये तो शिकत असून, पुढील शिक्षणही काम करतच घेणार असल्याचे चेतन सांगतो.
चेतनची जी काही स्वप्नं असतील ती पूर्ण करण्यास मी लागतील तेवढे कष्ट घेण्यास तयार आहे, अशी भावना त्याच्या आईने बोलून दाखवली. (प्रतिनिधी)

Web Title: Ideal for cheated students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.