आदर्श जीवनशैली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:22 AM2021-06-26T04:22:06+5:302021-06-26T04:22:06+5:30
पण अनेकांची झोपच बिघडल्यामुळं तणावावर इलाज तर होत नाहीच, उलट अपूर्ण व तुटक झोपेच्या दुष्परिणामांची त्यात भर पडते आणि ...
पण अनेकांची झोपच बिघडल्यामुळं तणावावर इलाज तर होत नाहीच, उलट अपूर्ण व तुटक झोपेच्या दुष्परिणामांची त्यात भर पडते आणि हे दुष्टचक्र चालू राहते. स्ट्रेस हा मनाच्या पातळीवर सुरू होतो, पण हळूहळू आंतरिक अवयवांवर त्याचे परिणाम दिसू लागतात. ही आंतरिंद्रिये त्यांच्यापरीने लढत असतात, परंतु जेव्हा त्यांची शक्ती कमी होत जाते, तसतसा रोगांचा शिरकाव व्हायला लागतो. उदाहरणार्थ, स्वादुपिंडाची कार्यक्षमता कमी होऊ लागली की मधुमेह होतो, गर्भाशयाची क्षमता कमी झाली की फायब्रॉइड्स होतात, अंडाशयामध्ये पीसीओडी, थायरॉईड, बद्धकोष्ठता, हृदयविकार, लठ्ठपणा, यकृताचे आजार इत्यादी. यांच्यावर उपाय म्हणून आपण लगेच औषधांकडे धाव घेतो. परंतु, विचार असा असावा, मी काय केले तर हे जीवनशैलीचे विकार होणार नाहीत किंवा कमी तीव्रतेत होतील किंवा शक्य तितकी वर्षे लांबणीवर टाकता येतील.
यावर सर्वांत महत्त्वाचा उपाय म्हणजे झोपेची क्वालिटी सुधारणे. जे लोक सातत्याने सात तासापेक्षा कमी झोपतात, त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ लागतात. हृदयाचे विकार व मधुमेह लवकर होतो. झोप पूर्णपणे सुधारल्यास ५० टक्के जीवनशैलीशी संबंधित आजार बरे होऊ शकतात. शांत झोप ही आज गरजेची असताना आपल्या या धकाधकीच्या जीवनात, कोरोनाच्या भीतीमुळे, मनातील अनेकविध संशयांमुळे, संभ्रमामुळे, पूर्वग्रहदुषित दृष्टिकोनामुळे झोपेचे खोबरे झाले आहे. त्यासाठी हे सारे बाजूला करून दिवसातील किमान आठ तास शांत झोप घेण्याचा प्रयत्न केला तर सर्व रोगांपासून आपण चार हात दूर राहू. त्याचबरोबर आपल्या जीवनशैलीत हे बदल करायला हवे. जसे की रोज सर्वांग सुंदर व्यायाम, योगासने, प्राणायाम दररोज नियमितपणे करणे गरजेचे आहे. मद्यपान व धूम्रपान करू नये. स्थूलता येऊ देऊ नये. यासाठी माफक आणि वेळच्यावेळी आहार घ्यावा. पाणी भरपूर प्यावे. दिवसातला काही काळ का होईना फोन, टी. व्ही. आणि लॅपटॉपशिवाय घालवावा. निरोगी नाती व संभाषण कौशल्य टिकवावे. रोज थोडावेळ तरी निसर्गात घालवावा. कोणत्याही नवीन डाएट ट्रेन्डच्या मागे जाऊ नये. दिवसातील काही काळ बाह्य विश्व सोडून स्वतःबरोबर राहावं. बदल कधीही मोठ्या प्रमाणावर आणि एकदम होत नाहीत. सातत्याने जीवनशैलीमध्ये छोटे-छोटे बदल करत गेलात की, २१ दिवसात सवय लागते. तीन महिने टिकवल्याने त्यांचे चांगल्या सवयींमध्ये रूपांतर होते. अलिकडच्या धकाधकीच्या जगात मन शांत ठेवून आपणी जीवनशैली आदर्श बनवली तर येणारे ताणतणाव तर दूर होतीलच शिवाय आपल्या आरोग्याबरोबरच कुटुंबाचे आरोग्य चांगले ठेवून समाज आरोग्य निरोगी व संपन्न बनवता येईल.
डॉ . गजानन पाटील