स्वस्तिक युवा प्रतिष्ठानचा आदर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:34 AM2021-05-06T04:34:04+5:302021-05-06T04:34:04+5:30
देवरुख : स्वस्तिक युवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी वृध्दावर अंत्यसंस्कार करुन आगळ्यावेगळ्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे. मराठा कॉलनीमधील हेमंत ...
देवरुख : स्वस्तिक युवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी वृध्दावर अंत्यसंस्कार करुन आगळ्यावेगळ्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे. मराठा कॉलनीमधील हेमंत शिंदे यांच्या चाळीतील भाडेकरू दत्तात्रय नारायण पडगे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करुन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोविड सेंटर लवकरच
संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात लवकरच ६० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंबरीश आगाशे यांनी दिली. संगमेश्वर तालुक्यात कोरोनाबाधितांसह पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढू लागले आहे.
रब्बी हंगामात भाजीपाला लागवड
लांजा : सलग वर्षभर कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू आहे. लॉकडाऊन, संचारबंदीच्या निर्णयातून भातशेतीसह लागवडीला वगळण्यात आले आहे. ग्रामीण भागातील रोजगारनिर्मितीचे प्रमाण वाढावे यासाठी स्थानिकांनी भाजीपाला लागवडीचा पर्याय स्वीकारला आहे. रब्बी हंगामातील लागवडीत यंदा २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ऑक्सिमीटर, सॅनिटायझरचे वाटप
गुहागर : तालुक्यातील चिंद्रावळे गावात भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांच्या वतीने ग्रामस्थांना ऑक्सिमीटर व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. गुहागर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढ असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे. चिंद्रावळे गावातही कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
नवीन रुग्णवाहिकांची गरज
चिपळूण : कोरोनाकाळात रुग्णवाहिका महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. तालुक्यातील कापरे व खरवते प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी असलेल्या दोन्ही रुग्णवाहिका जुन्या असल्याने त्यांची वारंवार दुरुस्ती करावी लागत आहे. त्यामुळे दाेन केंद्रांसाठी नवीन रुग्णवाहिकांची गरज असून, त्यासाठी जिल्हा परिषद सदस्या मीनल कानेकर यांनी पुढाकार घेतला आहे.
कोकणी मेव्याला फटका
रत्नागिरी : कोकणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनामुळे सर्वच घडी विस्कटली असून, त्याचा सर्वाधिक फटका नागरिकांना बसला तसाच फटका कोकणी मेव्याच्या उत्पादनाच्या उलाढालीवर होत आहे. दरवर्षी अनेक छोट्या-मोठ्या लोकांना त्याचा आधार असतो. परंतु या व्यवसायावर कोरोनामुळे परिणाम झाला आहे.