आदर्श शिक्षक प्रस्ताव आता आॅनलाईन
By admin | Published: August 5, 2016 12:52 AM2016-08-05T00:52:57+5:302016-08-05T02:02:44+5:30
५ आॅगस्टपर्यंत मुदत : शासनस्तरावरून निर्णय जाहीर
टेंभ्ये : महाराष्ट्र शासनाच्यावतीने दिला जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव यापुढे आॅनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. शासनस्तरावरुन या संदर्भातील निर्णय जाहीर झाला असून, यावर्षीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामुळे यापूर्वी ज्या शिक्षकांनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर केले आहेत, त्यांना आता नव्याने आॅनलाईन प्रस्ताव सादर करावे लागणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी सांगितले.
प्रत्येक वर्षी शासनाकडून शिक्षण क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यासाठी इच्छुक शिक्षकांना माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत प्रस्ताव सादर करावा लागत असे. त्यानंतर या प्रस्तावावर शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक यांच्या शिफारसी नोंदवून हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जात असे. या प्रक्रियेमध्ये आता शासनाने बदल केला असून, यापुढे आदर्श शिक्षक पुरस्काराचा प्रस्ताव हा आॅनलाईन पद्धतीने सादर करावा लागणार आहे. शासनाने या संदर्भातील सुधारीत निकष ठरवून दिले आहेत. सर्व पात्र शिक्षकांनी महाराष्ट्र प्रादेशिक शिक्षण परिषद (एमपीएसपी)च्या संकेतस्थळावर ६६६.१ी२ीं१ूँ.ल्ली३/१/स्र४१ं२‘ं१ या लिंकवर प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. सन २०१५-१६करिता ज्या शिक्षकांनी प्रस्ताव सादर केले आहेत, त्यांना पुन्हा आॅनलाईन पद्धतीने शुक्रवार, दि. ५ आॅगस्टपूर्वी प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी सन २०१६-१७पासून आॅनलाईन पद्धतीने आवेदनपत्र स्वीकारण्यात येणार आहेत. (वार्ताहर)