स्थानिकांना हवा असेल तर नाणार प्रकल्प होईल : राजन साळवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 07:49 PM2020-12-24T19:49:23+5:302020-12-24T19:52:29+5:30
Jaitapur atomic energy plant Rajan Salvi- कोकणात रोजगार नाही... नोकऱ्या नाहीत त्यामुळे प्रकल्प व्हावा, अशी मागणी स्थानिकांकडून पुढे येत आहे. भविष्यात स्थानिकांनी मागणी केली तर नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील, असा आशावाद वाटतो, असे सूचक विधान आमदार राजन साळवी यांनी मुंबईत एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले. त्यामुळे अनेक दिवस चर्चेबाहेर गेलेला नाणार प्रकल्पाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे आणि नाणार प्रकल्प समर्थकांच्या मनात आशेचा किरण चमकला आहे.
राजापूर : कोकणात रोजगार नाही... नोकऱ्या नाहीत त्यामुळे प्रकल्प व्हावा, अशी मागणी स्थानिकांकडून पुढे येत आहे. भविष्यात स्थानिकांनी मागणी केली तर नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील, असा आशावाद वाटतो, असे सूचक विधान आमदार राजन साळवी यांनी मुंबईत एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले. त्यामुळे अनेक दिवस चर्चेबाहेर गेलेला नाणार प्रकल्पाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे आणि नाणार प्रकल्प समर्थकांच्या मनात आशेचा किरण चमकला आहे.
राजापूर तालुक्यात आलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासह नाणार रिफायनरी प्रकल्पाविरुध्द शिवसेनेने सुरुवातीपासूनच प्रखर विरोधाची भूमिका घेतली होती. तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारविरोधात आंदोलने झाली. एका तरूणाचा त्यात मृत्यूही झाला. तरीही काँग्रेस आघाडी सरकारने आपले प्रयत्न सुरू ठेवले. अखेर हेक्टरी साडेबावीस लाख रुपये सानुग्रह देण्याची घोषणा सरकारने केल्यानंतर लोकांनी मोबदला स्वीकारण्यास सुरूवात केली. आतापर्यंत जैतापूर परिसरातील सुमारे ९५ टक्के प्रकल्पग्रस्त जनतेने शासनाकडून मिळणारा मोबदला स्वीकारला आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार राजन साळवी यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना आपली भूमिका मांडली. जैतापूरप्रमाणेच शासनाने नाणार प्रकल्पग्रस्तांना मोबदला दिला तर शिवसेनेचा विरोध मावळेल का? असा प्रश्न आमदार साळवी यांना विचारण्यात आला. त्यावर आमदार साळवी म्हणाले की, नाणार प्रकल्पासंदर्भात शिवसेना स्थानिक जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.
स्थानिक जनतेने विरोध केल्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुखांनी हा प्रकल्प रद्द करुन घेतला होता. मात्र, कोकणात रोजगार नाही, नोकऱ्या नाहीत त्यामुळे नाणार प्रकल्प व्हावा, अशी मागणी स्थानिक जनतेतून पुढे येत आहे. भविष्यात हा प्रकल्प व्हावा, अशी मागणी स्थानिकांनी केली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्याबद्दल योग्य निर्णय घेतील, असे साळवी यांनी सांगितले.
नाणार प्रकल्प व्हावा, यासाठी स्थानिक जनतेने पुढाकार घेतला तर निश्चितपणे राज्याच्या व जनतेच्या हितासाठी महाविकास आघाडी तसा निर्णय घेईल, असे आपल्याला वाटते, असेही साळवी म्हणाले.