सागरी महामार्गाची आठ दिवसात दुरुस्ती न केल्यास आंदोलन छेडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:21 AM2021-07-21T04:21:48+5:302021-07-21T04:21:48+5:30
राजापूर : सागरी महामार्गावरील अपघातास निमंत्रण ठरलेल्या होळी स्टॉप ते एच. पी. पंप या दरम्यानच्या रस्त्याची आठ दिवसात दुरुस्ती ...
राजापूर : सागरी महामार्गावरील अपघातास निमंत्रण ठरलेल्या होळी स्टॉप ते एच. पी. पंप या दरम्यानच्या रस्त्याची आठ दिवसात दुरुस्ती न केल्यास भारतीय जनता पार्टीच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल सोमवारी भाजपा पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता प्रमोद कांबळे यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला.
राजापूर तालुक्यातील होळी स्टॉप ते एच. पी. पंपपर्यंतच्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. या मार्गावरून वाहने चालविणेही अवघड बनले आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे हा रस्ता अपघातास निमंत्रण ठरत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीबाबतचा ठेका देऊनही संबंधित ठेकेदार काम करण्यास चालढकल करीत असल्याने पावसाळ्यात हा रस्ता जणू मृत्यूचा सापळा बनला आहे. याकडे भाजप पदाधिकाऱ्यांनी शाखा अभियंता कांबळे यांचे लक्ष वेधले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष जब्बार काझी, तालुका उपाध्यक्ष राजा काजवे, दीपक बेंद्रे, अरविंद लांजेकर, पंढरीनाथ आंबेरकर, महेश नारकर, दिव्य भोसले, साईराज करगुटकर, दिनेश चव्हाण, समीर मेस्त्री, प्रवीण काजवे, नीलेश चव्हाण, मंदार कांबळी, प्रणीत सुर्वे उपस्थित होते.
-----------------------------
सागरी महामार्गाच्या दुरवस्थेबाबत भाजपतर्फे शाखा अभियंता कांबळे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी रवींद्र नागरेकर, जब्बार काझी, दीपक बेंद्रे, राजा काजवे, पंढरीनाथ आंबेरकर, अरविंद लांजेकर उपस्थित हाेते.