जिल्ह्यासाठी पुरवठा वाढला तर डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:25 AM2021-05-30T04:25:26+5:302021-05-30T04:25:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : डिसेंबरपर्यंत कोरोना लसीकरण पूर्ण केले जाईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. जिल्ह्याची सद्यस्थिती ...

If the supply for the district increases, vaccination will be completed by December | जिल्ह्यासाठी पुरवठा वाढला तर डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण

जिल्ह्यासाठी पुरवठा वाढला तर डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : डिसेंबरपर्यंत कोरोना लसीकरण पूर्ण केले जाईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. जिल्ह्याची सद्यस्थिती पाहता अजूनही ४० ते ४५ टक्के लसीकरण होणे बाकी आहे. त्यामुळे सध्या लसीचा होणारा अपुरा पुरवठा पाहता ही डेडलाईन जिल्हा प्रशासनाला पाळणे अवघड आहे. मात्र, आता दिवसाला १५ हजार डोस देण्याची क्षमता जिल्ह्याची असल्याने लस त्या प्रमाणात उपलब्ध झाल्यास डिसेंबर २०२१पर्यंत लसीकरण पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाला वाटत आहे.

जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्ती ६ लाख ३२ हजार तर ४५ आणि त्यापुढील व्यक्ती ४ लाख ५७ हजार इतक्या आहेत. २८ मेपर्यंत १८ ते ४४ वयोगटातील २६ हजार व्यक्तींनी पहिला डोस घेतला असून, ४५ आणि त्यापुढील १ लाख २६ हजार ९९२ व्यक्तींनी पहिला डोस घेतला आहे. म्हणजे आतापर्यंत दीड लाख व्यक्तींनाच पहिला डोस मिळाला आहे. साडेनऊ लाख व्यक्तींना अजूनही पहिल्या डोसची प्रतीक्षा आहे.

सध्या जिल्ह्याला दोन्हीही लसीचे डोस मोठ्या प्रमाणावर मिळत आहेत. त्यामुळे दिवसाला अगदी १५,००० व्यक्तींना लसीकरण करण्याची जिल्ह्याची क्षमता आहे. त्यामुळे यापुढेही योग्यप्रकारे लस उपलब्ध झाल्यास अगदी अडीच ते तीन महिन्यात लसीकरण पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाला आहे.

१८पेक्षा कमी वयाचे काय?

जिल्ह्यासह राज्यात १ मेपासून १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींना लसीकरण करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत या वयोगटातील २६,०२९ व्यक्तींना कोरोना डोस देण्यात आला आहे.

परंतु, ४५ आणि त्यापुढील व्यक्तींना लस देण्यास प्राधान्य देण्यात आल्याने १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरूवात होताच या वयोगटासाठी लस अपुरी पडली.

लसचा पुरवठा कमी झाल्याने १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण थांबवले आहे. या वयोगटातील ६,३२,०००पैकी केवळ २९,००० व्यक्तींनाच पहिला डोस मिळाला असल्याने उर्वरितांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

आधी १०९ केंद्रे होती, आता केवळ १४

जिल्ह्याला सुरूवातीला मोठ्या प्रमाणावर कोविशिल्ड तसेच कोव्हॅक्सिन या दोन लसींचे डोस मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले होते. त्यामुळे सुरूवातीला जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालये आदी १०९ केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविण्यात येत होती. मात्र, लसीचा पुरवठा कमी झाल्याने जिल्ह्यात केवळ १४ केंद्रांवरच सध्या लसीकरण सुरू आहे. .

मध्यंतरी लसचा पुरवठा कमी झाला होता. मात्र, आता जेवढा येतो, तेवढा त्याचदिवशी संपविण्यात येतो. त्यामुळे आता राज्याकडून येणारा पुरवठाही वाढला आहे. काही दिवसांपूर्वी एका दिवसात १५,००० डोस दिले गेले. त्यामुळे या प्रमाणात पुरवठा झाला तर नक्कीच डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होईल.

- डॉ. इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी

Web Title: If the supply for the district increases, vaccination will be completed by December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.