मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात आडवे आल्यास गय करणार नाही, मंत्री रवींद्र चव्हाण यांची तंबी
By अरुण आडिवरेकर | Published: August 31, 2023 05:33 PM2023-08-31T17:33:42+5:302023-08-31T17:35:31+5:30
रत्नागिरी : मुंबई - गाेवा महामार्गाचे काम कोणामुळे रखडले याचा आधी अभ्यास करावा. आपल्याला हे काम पूर्ण करायचे आहे. ...
रत्नागिरी : मुंबई - गाेवा महामार्गाचे काम कोणामुळे रखडले याचा आधी अभ्यास करावा. आपल्याला हे काम पूर्ण करायचे आहे. मात्र, रस्ते कामात अडथळा आणून आडवे येण्याचा प्रयत्न केल्यास गय केली जाणार नाही, अशी तंबी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
मुंबई-गोवामहामार्गाचे काम गेल्या १२ वर्षांपासून रखडले आहे. निधीची कमतरता नसतानाही तरीही काम का पूर्ण होत नाही, असे प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्श्वभूमीवर महामार्ग रखडण्यामागील कारणे, स्थानिकांचे प्रश्न व त्यावर उपाय या विषयी कोकणवासीयांबरोबर चर्चा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चव्हाण यांनी डोंबिवली जिमखाना-मुंबई येथे खुले चर्चासत्र आयोजित केले होते. कोकण विकास समितीने यासाठी पुढाकार घेतला होता. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मनाेगत व्यक्त केले.
मंत्री चव्हाण म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गाच्या १२ वर्षांपासून रखडलेल्या रस्ते कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आतापर्यंत ४ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे; मात्र तरीही निधी व अन्य काही कारणे देत महामार्गाच्या रस्त्याचे काम रखडले आहे. या कामाच्या या पूर्वीच्या सर्व खर्चाचे विशेष लेखापरीक्षण करण्यात येईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करून एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी खुली करण्याच्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. महामार्गाच्या रस्तेकामाच्या पाहणीसाठी सातत्याने दौरे करत अधिकाऱ्यांना सूचना करत आहेत. मात्र, या मार्गावरुन सरकारवर निशाणा साधला जात असल्याने मंत्री चव्हाण यांनी त्याचाही समाचार घेतला.
कोकण विभागातून आलेल्या नागरिकांनी रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. महामार्गावरील एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना खुली केली जाईल, असा विश्वासही मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला.