सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल करण्याचे ध्येय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By मनोज मुळ्ये | Published: November 30, 2023 06:45 PM2023-11-30T18:45:33+5:302023-11-30T18:47:34+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण तसेच नमो ११ सुत्री कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते रत्नागिरीत झाला
रत्नागिरी : सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल झाला पाहिजे, त्याच्यासाठी चांगले दिवस आले पाहिजेत, हे ध्येय बाळगून महायुतीचे सरकार कार्यरत असल्याने हे सरकार गतिमान आहे. सामान्यांच्या मनातील सरकार आणि सामान्य मुख्यमंत्री असला की कामे गतीने होतात, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण तसेच नमो ११ सुत्री कार्यक्रमाचा शुभारंभ गुरुवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते रत्नागिरीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्याेगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य खात्याचे सचिव राजीव निवतकर, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, माजी आमदार विनय नातू, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
प्रथम मुख्यमंत्री शिंदे यांनी फीत कापून महाविद्यालयाचे लोकार्पण केले. त्यानंतर झालेल्या जाहीर कार्यक्रमात त्यांनी नमो ११ सुत्री कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यातील प्रातिनिधिक लाभार्थींना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधानांचे विशेष कौतुक केले. जगासमोर भारताची प्रतिमा उजवी करण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा हातभार आहे. त्यामुळेच त्यांच्या ७३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्य सरकारने नमो ११ सुत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. यातून सर्वसामान्य विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.