मर्दाची अवलाद असाल, धमक असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या, भास्कर जाधवांचे शिंदे गटाला आव्हान
By मनोज मुळ्ये | Published: September 3, 2022 07:04 PM2022-09-03T19:04:27+5:302022-09-03T19:05:23+5:30
कधी कंगना राणावत, कधी भोंगा, हिजाब, सुशांतसिंह राजपूत, नुपूर शर्मा यांना पुढे करून दंगल घडवायचे व सरकार पाडायचे असा अयशस्वी प्रयत्नही भाजपने केला.
संकेत गोयथळे
गुहागर : राज्यात दंगली घडवून सरकार पाडण्याचा अयशस्वी प्रयत्न भाजपने केला. मर्दाची अवलाद असाल, तुमच्यात धमक असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या. तुम्ही सच्चे आहात की बदमाश हे जनतेला ठरवू द्या, असे थेट आव्हान शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटाला दिले. छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन लवकरच रायगड जिल्ह्यातून आपण महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करणार असल्याचेही ते म्हणाले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुहागर तालुका शिवसेनेतर्फे मेळावा आयोजित करण्यात आला होता. शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल या मेळाव्यात आमदार जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना त्यांनी शिंदे गटावर तोफ डागली.
ते म्हणाले की, या सरकारने आमचं सरकार आलं आणि सण सुरू झाले असे बोर्ड लावले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून कोरोना काळात केलेल्या यशस्वी कामगिरीमुळेच आपले सण आज चांगल्या प्रकारे साजरे होत आहेत. उलट कोरोना काळात मुंबईकरांना गावाकडे येऊ नये, अशीच भूमिका येथील भाजप नेत्यांनी घेतली होती. शिवसेना व ठाकरे हे अतूट नाते आहे ते कोणीही तोडू शकत नाही भाजपला तुम्ही फक्त सत्तेपुरते हवे आहात.
सर्वधर्मसमभावाचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली म्हणूनच आज मुस्लिम समाज आमच्यासोबत येत आहे व हेच वातावरण भाजपला अस्वस्थ करत होते. कधी कंगना राणावत, कधी भोंगा, हिजाब, सुशांतसिंह राजपूत, नुपूर शर्मा यांना पुढे करून दंगल घडवायचे व सरकार पाडायचे असा अयशस्वी प्रयत्नही भाजपने केला.
यावेळी जिल्हाप्रमुख सचिन कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र सुर्वे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, महेश नाटेकर, प्रवीण ओक, विनायक मुळे, सचिन बाईत, जयदेव मोरे, विलास गुरव, संजय पवार उपस्थित होते.