लग्नाच्या शूटिंगसाठी ड्राेन वापरणार असाल, तर सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:31 AM2021-07-29T04:31:30+5:302021-07-29T04:31:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : प्री वेडिंग किंवा वेडिंग शूटिंग करायची असेल, तरी त्यासाठी भारत सरकारची परवानगी घेणे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : प्री वेडिंग किंवा वेडिंग शूटिंग करायची असेल, तरी त्यासाठी भारत सरकारची परवानगी घेणे क्रमप्राप्त असून, ऑनलाइन अर्ज करावा लागतो. पोलीस मुख्यालयात अर्जधारकांच्या कागदोपत्रांची तपासणी केली जाते. परवानगीनंतरच ‘ड्रोन’ उडविणे शक्य आहे. निर्बंधामुळे छायाचित्रकार अडचणीत आले आहेत. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होत आहे.
वेडिंग व प्री वेडिंगसाठी शूटिंग किंवा फोटोग्राफी हाैसेने केली जात असल्याने फोटोग्राफी व शूटिंगसाठी यथाशक्ती खर्च केला जातो. बहुधा ओपन लाॅनमध्ये लग्नसाेहळा किंवा स्वागतसोहळा असेल, तर त्याच्या शूटिंगसाठी ‘ड्रोन’चा वापर केला जातो. मात्र, आता सहज ड्रोन वापरणे शक्य नाही. शासकीय परवानगी असेल, तरच ड्रोन वापरला जाऊ शकतो, अन्यथा कारवाईची शक्यता असल्याने फोटो व्यावसायिक धास्तावले आहेत. अधिकृत नोंदणीधारकांसाठी ड्रोन उडविण्यासाठी शासकीय निर्बंध शिथिल करण्याची मागणी होत आहे.
ड्राेन उडविण्यासाठी परवानगी हवीच
ऊठसूठ ड्रोन वापरून त्याचा गैरकामासाठी वापर केला जात असल्याचे निदर्शनास येताच निर्बंध लावण्यात आले आहेत.
ड्रोन उडविण्यासाठी भारत सरकारची परवानगी घेणे आवश्यक असून, किती वजनाचा ड्रोन, किती उंचीवर उडविणार नमूद करणे गरजेचे.
परवानगी प्राप्त झाल्यानंतरच ड्रोन वापरता येणार आहे. परवानगीशिवाय वापरला गेल्यास त्यावर कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आहे.
शहरात ड्रोन वापराबाबत शासकीय परवानाधारक अवघे चारच आहेत. कित्येक छायाचित्रकारांकडील सुरुवातीला घेतलेले ड्रोन शासकीय
निर्बंधामुळे विनावापर पडून आहेत.
ड्रोन वापरताना किती वजनाचा वापरणार यासाठी नियमावली आहे. किती उंचीवर उडविला जाणार आहे, त्यावर त्याचे वजन निश्चित होते.
ड्रोन उडविताना तो नेमक्या कोणत्या भागात उडविला जाणार आहे, शिवाय कशासाठी उडविला जाणार आहे, याची माहिती परवानगी घेताना देणे आवश्यक आहे.
मायक्रो, स्माॅल कॅमेरा असलेल्या ड्रोनचाही वापर केला जातो. परवानगी घेताना कोणता वापर होणार हे नमूद करावेच लागते.
भारत सरकारकडे ऑनलाइन अर्ज सादरीकरण केल्यावर मंजुरी दिली किंवा नाकारली जाऊ शकते.
गैरवापर वाढल्यामुळेच ड्रोन वापरण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. पोलीस मुख्यालयात कागदपत्राची छाननी फक्त केली जाते.
...............................
छायाचित्रकार ड्रोन वापरण्याबाबत शासकीय परवाना घेत असले, तरी वापरासाठी वेळोवेळी परवाना घ्यावा लागत असल्याने ताण वाढला आहे. लग्नसोहळ्याच्या शूटिंगसाठी ड्रोन वापराबाबत परवानगीची अट शिथिल करण्याची आवश्यकता आहे.
- कांचन मालगुंडकर, सदस्य, ऑल महाराष्ट्र फोट्रोग्राफी असोसिएशन