हिम्मत असेल तर शिवसेना सोडली म्हणावी!, खासदार विनायक राऊतांचे बंडखोर आमदारांना खुलं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 12:28 PM2022-07-05T12:28:48+5:302022-07-05T12:42:06+5:30
शिवसेना कशी संपवता येईल, यासाठी भाजपने हा डाव रचला आहे. मात्र आता हिम्मत असेल, तर त्यांनी पोट निवडणुकीला सामोरे जावे. आमची त्यासाठी तयारी आहे.
चिपळूण : शिवसेनेतून जे आमदार गेले ते बंडखोर व गद्दारच आहेत. त्यांना यापुढे पक्षात कधीही घेतले जाणार नाही. त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. शिवसेनेचं नाव घेण्याचीही नैतिकता त्यांच्याकडे राहिलेली नाही. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हायजॅक करण्याचा अधिकार कोणालाही नाही. तेव्हा बंडखोर आमदारांमध्ये हिम्मत असेल, तर आम्ही शिवसेना सोडली म्हणून त्यांनी जाहीर करावं, असे खुले आव्हान शिवसेना पक्षाचे सचिव व खासदार विनायक राऊत यांनी येथे दिले.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढले असून महामार्गावरील परशुराम घाटात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच दरडीचा ही धोका निर्माण झाल्याने या घाटाची पाहणी करण्यासाठी खासदार राऊत हे आज, मंगळवारी चिपळुणात आले होते.
यावेळी राजकीय घडामोडींविषयी बोलताना ते म्हणाले, अख्ख्या देशाला लांच्छनास्पद ठरेल असे राजकारण भाजप पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रात घडले. दुर्देवाने शिवसेनेचे 40 आमदार त्याला बळी पडले. सत्तेची लालसा व मुख्यमंत्रीपदाचा हव्यास त्याला कारणीभूत ठरला. त्यासाठी कित्येक कोटींची उधळण झाली. प्रत्येकी 50 ते 70 कोटी दिल्याची चर्चा सुरू असली तरी प्रत्यक्षात चार हजार कोटींहून अधिक रुपयांचा बाजार मांडला गेला. त्यासाठी ईडी सीबीआयचा दुरुपयोग केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून केला गेला. जुनी प्रकरण शोधून काढायची आणि त्याचा फायदा उठवायचा. संतोष बांगर हेदेखील भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकले. अशा राजकारणाने लोकशाही शिल्लक राहणार नाही.
..तर पोटनिवडणुकीला सामोरे जावे
शिवसेना कशी संपवता येईल, यासाठी भाजपने हा डाव रचला आहे. मात्र आता हिम्मत असेल, तर त्यांनी पोट निवडणुकीला सामोरे जावे. आमची त्यासाठी तयारी आहे. शिवसेना पक्षाची कार्यकारणी आजही तितकीच मजबूत आहे. तरीही ज्यांना पक्ष सोडून जायचे आहे, त्यांनी पक्षात थांबू नये असे खुद्द उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. कारण हा निष्ठावंतांचा पक्ष असून अशा लोकांनाच यापुढे घेऊन पक्ष काम करणार आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरीतील मेळाव्यात निष्ठावंत्यांनाच प्रवेश
रत्नागिरी येथे 10 जुलै रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेना मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा केवळ निष्ठावंतांसाठी असणार आहे. ज्यांनी बंडखोरी केली, त्यांना या मेळाव्यात येण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असा टोला खासदार राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या आमदार उदय सामंत यांना लगावला.