मुलांना सुरक्षित ठेवायचं आहे तर वाचाच...! - भाग १
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:21 AM2021-07-04T04:21:31+5:302021-07-04T04:21:31+5:30
आज पालक आपल्या पाल्याच्या आरोग्यासाठी खूप जागरूक आहेत; पण तरीही काही प्रसंगी त्याला काही सुचत नसतं. त्या वेळेस त्याने ...
आज पालक आपल्या पाल्याच्या आरोग्यासाठी खूप जागरूक आहेत; पण तरीही काही प्रसंगी त्याला काही सुचत नसतं. त्या वेळेस त्याने आवर्जून आपल्या नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. साधारणत: तीन दिवस ताप येत असेल, लघवी कमी होत असेल (डिहायड्रेशन म्हणजेच निर्जलीकरण) तर मूल सुस्त असेल किंवा सतत झोपत असेल तर, धाप लागत असेल किंवा श्वासाचा दर वाढत असेल, अंगावर चट्टे, पुरळ, डोळे लाल होणे, लाल ओठ, कधी आकडी आल्यासारखी होणे आणि क्वचित शुद्ध हरपल्यासारखी वाटली तर लगेच आपल्या डॉक्टरांना फोन करावा, त्यांच्याकडे न्यावे किंवा जवळच्या रुग्णालयात न्यावे. बी.सी.जी. व्रण लाल होणे, चिडचिडेपणा, सतत किरकिर करणे, रडणे, पोट दुखणे, जुलाब किंवा उलट्या होणे, हातावर सूज येणे अशी लक्षणे असू शकतात. सहसा मागील तीन महिन्यांत कोविड किंवा कोविड रुग्णांचा जवळून संपर्क आल्यास असा धोका मुलांना संभवतो. आपल्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क आपल्या मुलांना आरोग्यदायी कवच बहाल करते.
मुळात मुलांची प्रतिकारशक्ती उत्तम असते. त्यामुळे लगेच उपचार केले तर ९० टक्के, ९५ टक्के सौम्य संसर्ग होतो. तो लगेच आटोक्यातही येतो. अशा सौम्य लक्षणे असलेल्या मुलांना घरची मायेची ऊब केव्हाही त्याचं मन प्रफुल्लित ठेवते. म्हणून सौम्य कोविडची लक्षणे दिसताच डॉक्टरांना संपर्क करणे आवश्यक आहे, नव्हे कराच. सौम्य कोविडमध्ये मूल नॉर्मल दिसतं. मूल कमी खातं; पण खात-पीत असतं. श्वासाचा वेगही नॉर्मल असतो. वर जी लक्षणे मी सांगितली आहे, ती निव्वळ मुलाची ही अवस्था टाळावी यासाठी; कारण अशा मुलांना बाल कोविड रुग्णालयातच अॅडमिट करणे आवश्यक आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन आरोग्य शासनाने अशी रुग्णालये सुरू केली आहेत. रत्नागिरीत असेच महाराष्ट्रातील पहिले बाल कोविड रुग्णालय सुसज्ज केले आहे. मुलांची मानसिकता लक्षात ठेवून या बाल कोविड रुग्णालयाची सुंदर मांडणी केली आहे, ती अभिनंदनीय आहे. परंतु तशी अॅडमिट व्हायची वेळच येऊ नये यासाठीच आपण खबरदारी घेऊ या. मुलांना सुरक्षित करूया आणि घर आनंदी ठेवूया...!
(क्रमश:)