पावसात तुंबणाऱ्या भिंगळोलीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:22 AM2021-07-16T04:22:52+5:302021-07-16T04:22:52+5:30
मंडणगड : शहरीकरणाच्या समस्येने ग्रासलेल्या भिंगळोली गावात एस. टी. आगार ते दापोली फाटा या सखल भागात मुख्य रस्त्यावर थोड्या ...
मंडणगड : शहरीकरणाच्या समस्येने ग्रासलेल्या भिंगळोली गावात एस. टी. आगार ते दापोली फाटा या सखल भागात मुख्य रस्त्यावर थोड्या पावसानेही पाणी साठल्याने वाहतुकीला वारंवार अडथळा निर्माण होण्याची समस्या गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने निर्माण होत आहे. स्थानिक ग्रामपंचायत व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या समस्येकडे गांभीर्याने पाहत नसल्याने मार्गावरील प्रवाशांसह परिसरातील नागरिकांच्याही अडचणीत वारंवार भरणाऱ्या पाण्यामुळे वाढ होत आहे.
या परिसरात रस्त्यांचे बाजूने गटार व साईटपट्टी नसल्याने या समस्येवर दीर्घकालीन उपायांची आवश्यकता आहे. मंडणगड शहराचे खालोखाल भिंगळोली गावाचा तालुक्यात सर्वाधिक विकास होत आहे. पूर्वी काहीही बांधकाम नसणाऱ्या या भागात रस्त्याचे दोन्ही बाजूने बांधकामे झाली आहेत. त्यातच रस्त्याशेजारी गटारे व साईडपट्टी बांधणे, नालेसफाई करणे हे नेमके कोणाचे काम आहे, याविषयी दोन्ही यंत्रणांमध्ये गैरसमज असल्याने कोणीच काम करत नसल्याचे दिसत आहे. तीन - चार तास सातत्याने पाऊस पडला तरी रस्त्यावरुन पाणी जाण्यास वाव नसल्याने पाणी साठते व त्याचा परिणाम सगळ्यांना भोगावा लागत आहे. गेल्या चार दिवसात झालेल्या पावसातही पाणी साठल्याने वाहतूक बंद करण्याचा प्रसंग निर्माण झाला होता. सखल मैदानी भाग हाच समस्येचे कारण असले तरी यावर ग्रामपंचायत अथवा महामार्ग प्राधिकरणाने प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
----------------------------
पावसामुळे पाणी साठण्याच्या समस्येला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाइतकीच स्थानिक ग्रामपंचायतही जबाबदार आहे. यंदा ग्रामपंचायतीने पावसापूर्वी कोठेही नाले व गटारे साफ केलेली नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या विविध भागात पाणी साठण्याची समस्या उद्भवलेली आहे. रस्त्याच्या शेजारी असलेली गटारे व नाले अग्रक्रमाने साफ करुन घेण्याची आवश्यकता आहे. ग्रामपंचायत व प्राधिकरणाने संगनमताने नियोजन करुन या समस्येवर उपाय शोधावा.
- राकेश साळुंखे, माजी उपसरपंच, भिंगळाेली.