आजारपणाच्या काळात पक्षाने दुर्लक्ष केले, शिवसेनेत प्रवेश करताच सुदेश मयेकर यांनी व्यक्त केली खंत
By मनोज मुळ्ये | Published: January 10, 2024 01:58 PM2024-01-10T13:58:35+5:302024-01-10T13:59:37+5:30
शरद पवार तसेच अजित पवार यांचे कायम ऋणी राहू
रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष असताना आपण आजारी असताना होतो. मात्र त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही नेत्याने, पदाधिकाऱ्याने किंवा कार्यकर्त्याने आपली साधी विचारपूसही केली नाही, अशी खंत सुदेश मयेकर यांनी व्यक्त केली. मात्र त्याचवेळी विरुद्ध पक्षात असतानाही मंत्री उदय सामंत आणि त्यांचे भाऊ शिवसेनेचे नेते किरण सामंत या दोघांनीही आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला चांगला आधार दिला. त्यामुळे यापुढे आपण त्यांनाच साथ देणार असल्याचे मयेकर यांनी सांगितले.
सुदेश मयेकर यांनी बुधवारी पाली येथे मंत्री सामंत यांच्या निवासस्थानी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला, त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही खंत व्यक्त केली. अजित पवार यांनी स्वतंत्र गट केल्यानंतरही आपण पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत कायम राहिलो. त्यावेळी आपल्याला पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद दिले गेले. केवळ जिल्हाध्यक्ष पदच नाही तर नगरसेवकासह अनेक पदे आपल्याला पक्षाने दिली. त्यासाठी आपण शरद पवार तसेच अजित पवार यांचे कायम ऋणी राहू.
मात्र जिल्हाध्यक्ष असताना आपण फार मोठ्या आजारपणातून गेलो आणि त्या काळात राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याने किंवा पदाधिकाऱ्याने आपली साधी विचारपूसही केली नाही. त्यावेळी मंत्री उदय सामंत किरण सामंत हे मात्र आपण आणि आपल्या कुटुंबासोबत कायम होते. त्यांनी खूप मोठा आधार दिला. त्यामुळे आपण त्यांच्यासोबत पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहर प्रमुख यांच्या जोडीने रत्नागिरी शहर आणि तालुक्यात पक्षवाढीवर आपला सर्वाधिक भर असेल, असेही मयेकर यांनी यावेळी सांगितले.